Top Post Ad

ठाणे महापालिकेची २०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पथके कामगिरीवर

  ठाणे -:महाड परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्यात येणारे मदत कार्य हे "आपलं शहर, आपली माणसं" या उदान्त हेतूने करण्याची भावनिक साद घालतानाच मदतकार्यासाठी राज्य शासन, सर्व महापालिका प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन नेटाने काम करत असून सर्वांच्या सहकार्याने महाड लवकरच पूर्वपदावर येईल असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाड आणि पोलादपूरसाठी यापूर्वीच रवाना करण्यात आली आहेत.

 महाड येथे मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या २०० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत केलेल्या कामाची आज पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून संपूर्ण कामाचे कौतुक केले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, महापौर नरेश म्हस्के, पोलीस उप अधीक्षक निलेश तांबे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देखमुख, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवार, मुख्याधिकारी जीवन पाटील, तहसीलदार सुरेश काशीद आदी उपस्थिती होते.   यावेळी महाड शहराच्या स्वच्छतेसाठी ना. एकनाथ शिंदे यांनी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही  केली.राज्य शासनाकडून जास्तीत जास्त भरीव मदत देण्याचा प्रयन्त करण्यात येणार आहे. तसेच लहान मोठ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधून व्यवसाय उभारणीसाठी कमीत कमी व्याजात कर्ज पुरवठा देण्यासाठी राष्ट्रीय, सहकारी बँकेना, विमा कंपनीना विनंती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

         महाडमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पहिल्या दिवसापासून महापालिकेच्या टीडीआरएफ, घनकचरा, पाणीपुरवठा, अग्निशमन, मलनि:स्सारण तसेच आरोग्य महापालिकेची पथकाने व्यापक प्रमाणात कार्य केले आहे. या सोबतच बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेची पथके  देखील महाडमध्ये कार्यरत आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे १२० कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेने पाठवलेली ड्रनेज लाईन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, ५ घंटागाड्या, ठाणे महानगरपालिकेची ६ अत्याधुनिक जेटिंग मशिन्स, फायर ब्रिगेड टँकर्स, टॅंकर्स, स्प्रेइंग मशीनस, रोगराई पसरू नये यासाठी मारण्यात येणारी फोगिंग मशिन्स आदी यंत्रणेचा समावेश आहे. 

         महाड परिसरात कुठलाही साथरोग उद्भवू नये यासाठी वैद्यकीय पथकामार्फत स्थानिक नागरिकांच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरिकांची रॅपिड ॲटीजन टेस्ट, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात येत असून चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचारी व महाड नगर परिषद यांच्या समन्वयाने सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत असून फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे अग्निशमनदलाच्यावतीने प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात येत आहे.


तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच ६० घरांचे पुनर्वसन
महाड - तळीये या गावातील ग्रामस्थांचे सुरक्षित जागी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच ६० घरांचे पुनर्वसन नवीन जागी केलं जाईल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी आणलेली जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यासाठी  शिंदे यांनी तळीयेला पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी त्यांनी महाड सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचीही घोषणा केली. तळीये दुर्घटना घडली त्याच डोंगराच्या दुसरीकडील भागाला देखील भेगा पडल्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ही भेग तीन किलोमीटर पर्यंत लांब असल्याने या कड्याच्या पायथ्याशी असलेल्या आवड, कुम्हण अळी, खालचे आवाड, मधले आवाड आणि तळीये म्हणजेच कोंडाळकर आवाड अशा पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नक्की सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. महाड मधील सत्र न्यायालयाच्या इमारतीचे देखील या पुरात अतोनात नुकसान झाले आहे. पुरामुळे नदीलगतची कोर्टाची इमारत पाण्याखाली गेल्याने आतील दालने व फर्निचरचे नुकसान झाले आहे. कोर्टातील कागदपत्रेही पाण्याखाली गेली होती. श्री. शिंदे यांनी शनिवारी या इमारतीला भेट देऊन पाहाणी केली. खराब झालेल्या गोष्टींची लवकरात लवकर दुरुस्ती करून इमारतीतून कामकाजाला पुन्हा सुरुवात व्हावी, यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा  शिंदे यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com