नवी दिल्ली : प्रकल्प केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैंकी एक असलेला मुंबई ते दिल्ली महामार्ग जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तवली आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते थेट मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. दिल्ली – मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाचे काम समोर येणाऱ्या अनेक अडचणींवर मार्ग काढून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये ३६.५ किलोमीटर प्रति दिवस गतीने एक्सप्रेस निर्माणाचे काम पूर्ण करण्यात आले. आत्तापर्यंत निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांपैंकी हे काम रेकॉर्डब्रेक गतीने झाले आहे. कामाची हीच गती कायम राहिली तर राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाचे काम वेळेच्या अगोदरच पूर्ण होऊ शकेल. अशी माहिती नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली
हा राष्ट्रीय महामार्ग पूर्व-पश्चिम कॉरिडोरचा एक भाग आहे. यामध्ये आठ लेन असतील. हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. या महामार्गाची लांब १३५० किलोमीटर असेल. या प्रकल्पासाठी ९० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडण्याचं काम करेल. देशातील दोन मोठ्या शहरांना जोडण्याशिवाय या महामार्गामुळे इतर महामार्गांवरचा वाहतुकीचा ताण कमी करू शकेल. दिल्ली - मुंबई महामार्गाच्या ३५० किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय तर अद्याप ८२५ किलोमीटर रस्त्याचं काम प्रगती पथावर आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्राण्यांच्या सुविधेसाठी ओव्हरपास असणारा हा आशियातील पहिला - वहिला एक्सप्रेस वे ठरणार आहे. तसंच हा एक्सप्रेस 'ग्रीन एक्सप्रेस - वे' असेल. या महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी वृक्षारोपण करण्यासाठी शालेय मुलांना प्रोत्साहीत केलं जाणार आहे.
0 टिप्पण्या