बौद्ध धम्माचा प्रभाव जनमानसावर होता. सम्राट अशोकांनी भारताबाहेर धम्माचा प्रसार केला. संपूर्ण आशिया खंडाला धम्माचा प्रभाव होता हे भारतीय व पाश्चात्य विचारवंतांनीही कबूल केले असून, बौध्द धम्म हा वैश्विक धम्म असल्याचा निर्वाळा दिला आहे. असा धर्म जो व्यक्तीच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या कसोट्यांना प्राधान्य देतो. माणसाने माणसाशी उचित व्यवहार करणे हे बुद्धाच्या धम्माचे सारतत्व आहे! इतर धर्मातील तत्वांचा विचार करता, ही मुभा आहे काय? पण धर्माचे अनुयायी व धर्मसमर्थकांना हा प्रश्न कधीच पडला नाही. आणि पडला तरी त्यामागील वास्तवाचा मागोवा घेऊन, त्यातील सत्य- असत्य समोर ठेवून त्याची चिरफाड करण्याचे धारिष्ट्य नसल्याने त्यांच्या कार्यप्रणाली व विचारप्रणालीला मर्यादा पडल्या. या मर्यादा पडण्याचे कारण
१) ईश्वरी आज्ञेच्या प्रभावाखाली धर्माचे अनुयायी दबले गेले आहेत.
२) ईश्वरी संकेतांना डावलले म्हणजे त्याचा कोप झालास धर्मातही जागा मिळणार नाही या भीतीचा त्याच्या मनावर बसलेला पगडा!
३) जेथे ईश्वर, अल्ला आला तेथे आत्म्याची भानगड आलीच.
४) जर धर्माज्ञा केली तरआत्म्याला मुक्ती नाही, यामुळे धर्मातील असामाजिक तत्वांविरोधात ब्र काढण्याची कोणालाच हिंमत होत नाही. इस्लाममध्ये तरी काय वेगळे आहे? तेथे तर अल्लाह सोडून अन्य कोणाला महत्त्व देण्यास सक्त मनाई आहे. इतरांवर श्रद्धा ठेवणे याचा अर्थ अल्लाहची आज्ञा मोडणे असा नियम असून त्याची आज्ञा मोडणाऱ्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे! जेथे धर्म तेथे अद्वैतवाद आपोआपच येतो. जो आत्मा परमात्मा एकच असल्याचे ठासून सांगतो. अशी विचारधारा धर्माच्या तत्वज्ञानाचा अंग असल्याचे धर्माचे समर्थकच प्रचार करत असल्याने या प्रचारास सामान्य माणूस बळी पडत गेला हे वास्तव बहुजनवादी समजून घेणार आहेत की नाही?

उदा.डोळे, नाक, त्वचा, कान, जीभ ही ती इंद्रिये असून, यांच्या सहाय्याने चांगले, वाईट (मिथ्या) हे ओळखता येते. सामान्य भाषेत सांगायचे तर आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना, वातावरणातील बदलाच्या प्रक्रिया, व त्यातून निर्माण होणारे तरंग याच्या जाणीवा करून देण्याचे काम ही इंद्रिये करत असतात. त्यांना आदेश देण्याचे काम मनुष्याचा मेंदू करीत असतो. माणसाचा मेंदू हे दुसरे संगणक म्हणता येईल. सकारात्मक-नकारात्मक अशा जेवढ्या म्हणून गोष्टी घडतात, त्यामागे मनुष्याचे मन कारणीभूत असते असे आपण गृहीत धरलेले असते. मन दिसत नाही असे आपण सहज बोलून जातो. पण ते अव्यक्त आहे असा अभिप्राय जेव्हा प्रवचनकार देतात, त्यावेळी जिवंतपणी मनुष्य नावाच्या प्राण्याचा ते मुडदा पाडीत असतात, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. वास्तवाशी फारकत घेऊन, अशाप्रकारचा धादांत खोटा व चुकीचा प्रचार करून वाचिक हत्याच ही मंडळी करीत असतात नाही का? प्रवचने कशासाठी हवीत? आजवर जेवढे संत झाले त्यांनी केलेला उपदेश हा प्रवचनाचाच भाग होता. प्रवचनाच्या माध्यमातून सामाज प्रबोधनाचे व समाज जोडण्याचे भरीव काम करता आले पाहिजे. याउलट सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून, असामाजिक प्रश्नांबरोबरच थेट लोकांच्या चुलीपर्यंत, जाऊ पाहणारे, हास्यविनोदाची पेरणी करीत जेव्हा बेडरूमच्या आत प्रवेश करतात तेव्हा त्याचा इंदुरीकर होतो याचे भान प्रवचनकारांनी ठेवले पाहिजे.
गुणाजी काजीर्डेकर 9323632320, चेंबूर मुंबई
0 टिप्पण्या