Trending

6/recent/ticker-posts

लोकलबंदी - प्रवासी नागरीक आक्रमक


 मुंबई : दीड ते दोन महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता  मुंबईकरांचा प्रवास पुन्हा  हळुहळू पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मर्यादित मुभा मिळाली असली तरी लोकलबंदी कायम असल्याने सामान्य नागरिक आणि रेल्वे कर्मचारी यांच्यात  होत असलेला वाद टोकाला जाऊन हाणामारी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

दिवा रेल्वे स्थानकात  विनातिकीट लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड भरायला सांगितला म्हणून दोन प्रवाशांनी मुख्य तिकीट निरीक्षक विकास पाटील यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यात पाटील जखमी झाले. या प्रकरणी आरोपींना अटक करून त्यांच्यावर ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर घरावर पत्रा बसवण्याचे काम करणारे एक प्रवासी शिवाजी जाधव यांना कुर्ला ते पनवेल असा प्रवास करायचा होता. यासाठी ते कुर्ला स्थानकातील तिकीट खिडकीवर रेल्वे तिकीट घेण्यासाठी गेले असता, अत्यावश्यक सेवेत नसल्याने रेल्वे तिकीट मिळणार नसल्याचे तिकीट खिडकीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. विनंती करूनही तिकीट मिळत नसल्याने अखेर जाधव आणि संबंधित कर्मचारी यांच्यात वाद झाला. अखेर रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या अनेक सर्वसामान्य प्रवाशांना या त्रासातून सध्या जावे लागत आहे. 'लॉकडाउन काळात आधीच कमाई नव्हती. आता पावसाळ्याच्या तोंडावर कमाईची संधी मिळाल्यावर रेल्वेकडून तिकीट देण्यात येत नाही. विनातिकीट प्रवास केल्यास टीसी दंड आकारतात. आणखी किती काळ मध्य रेल्वेकडून ही दडपशाही सुरू राहणार आहे', असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे. 

राज्य सरकारने सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिलेली नाही. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र पाहूनच तिकीट देण्यात येते. करोना निर्बंधात मोकळीक देताना सर्वसामान्यांना तिकीट देण्याबाबत महापालिका किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाही, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या