तिसरी लाट येणार ?... ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्टर्स व नर्सेसना सेवेतून कमी करू नये

   ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयाच्या डॉक्टर्स व नर्सेसला कामावरून कमी करु नये.---श्रमिक जनता संघाची मागणी.

ठाणे ग्लोबल रुग्णालयातील 50 डॉक्टर्स, 200 नर्सेसला अचानक कामावरून काढण्याबाबतीत रुग्णालय प्रशासनाची नोटिस म्हणजे ‘ गरज सरो वैद्य मरो'. कोविड ची तीसरी लाट येत असल्याची शक्यता मुख्यमंत्रीसह महाराष्ट्र प्रशासन वर्तवत असताना ठाणे महापालिका प्रशासनाची ही भूमिका अतिशय निषेधार्ह आहे. अशा तऱ्हेची अन्यायकारक कामगिरी ठाणे महानगर पालिकेने करू नये, अशी मागणी श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांना पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना ग्लोबल कोविड सेंटरच्या कंत्राटदाराने शुक्रवारी रात्री 50 डॉक्टर्स आणि 200 नर्सेसना कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा अचानक बजावल्या असल्या तरी कंत्राटदाराचे हे फरमान महापालिका अधिकार्यांच्या संंम्मती शिवाय निघणे शक्य नाही.असे आरोप करत डॉक्टर आणि नर्सेसच्या न्याय्य आंदोलनाला श्रमिक जनता संघाचा पाठिंबा असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

रुग्णालयाच्या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर मैसेज टाकून काढून टाकण्याच्या या हिटलरी पध्दतीने करोना योध्दांच्या घोर अपमान केला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोविड सेंटर्समध्ये कर्मचारी कपात केली जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यापूर्वी जाहीर केले असतांना कंत्राटी कर्मचार्‍यांना कमी करण्याचा षडयंत्र म्हणजे महापालिका आयुक्तांचा देखील अपमान आहे. ठेकेदारालापाठीशी घालण्यामागे कुणाचा हात आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ही पत्रात केली आहे.

करोना काळात जीवाची परवा न करत सेवा देणारे या करोना योध्दांना कामावरून कमी न करता तिसरी लाट येईस्तोवर ग्लोबल रुग्णालयात नागरिकांना अन्य उपचारासाठी सेवा सुरू करावी. 

पावसाळ्यात मलेरिया,फ्लू,  डेंग्यू, सारखे आजार वाढतात जे करोना लागण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अश्या उपचारासाठी या डॉक्टर, नर्सेस, आया वार्डबाय आणि सफाई कामगारांचा उपयोग करावा. अशी मागणी देखील युनियन तर्फे करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना औषधे बाहेरहून आणाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावं लागतं. करोना महामारी मुळे ठाण्यातील बहुसंख्य असंगठित मजूरांचे रोजगार बुडाले आहेत.अश्या वेळी वेळी बाहेरून औषधे आणण्यासाठी सांगणारी यंत्रणा लोकहिताची कशी असू शकते? असा सवाल करत ठाणेकरांच्या आरोग्य रक्षणासाठी आरोग्य सेवा मजबूत करावी व रुग्ण सेवकांना कामावरून कामावरून कमी करु नये. आणि लोकहिता साठी मुजोर ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांचे विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रात केली आहे.

दरम्यान ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत ५० डॉक्टर आणि २०२ नर्स यांच्यासह वॉर्डबॉयला व्हॉट्स अॅप मेसेजद्वारे कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात अनेक सामाजिक संघटनांसह  भारतीय जनता पक्ष  आणि राष्ट्रवादीचे शानू पठाण यांनीही आवाज उठवला. त्यामुळे अखेर कंत्राटदाराने नमते घेऊन पुन्हा सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या