अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि
माजिवाडा-मानपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या उपस्थितीत कारवाई
ठाणे- घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलच्या मागे, पारिजात सोसायटीच्या समोरील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्याचे काम तेजीत सुरु होते. येथील रहिवाशांचा या गाळे उभारणीला तीव्र विरोध होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची आणि त्यांच्या गुंडांच्या दहशतीमुळे येथील रहिवाशांना शांत बसून हे सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. तर अतिक्रमण निष्कासन विभागातील अधिकाऱ्यांना `रिटर्न गिफ्ट' मिळत असल्याने तेही चिडीचूप होते. मात्र काही रहिवाशांच्या आक्रमकतेमुळे अखेर ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना याबाबत दखल घ्यावी लागली. आणि त्यांच्या आदेशानंतर अतिक्रमण व निष्कासन विभागाच्या वतीने शनिवारी जमिनदोस्त करण्यात आले. अशा अनधिकृत, अतिक्रमण होणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी देखील ठामपा प्रशासनाला पत्राद्वारे निर्देश दिले होते.. या धडक कारवाईमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे हायपरसिटी मॉलच्या मागे पारिजात सोसायटी समोर मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत एक दीड महिन्यांपूर्वी ८ अनधिकृत गाळ्यांची उभारणी झाली, तेव्हा स्थानिकांनी विरोध केला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विरोधात आवाज उठवला. मात्र त्यानंतर अजून 3 गाळ्यांची उभारणीचे काम सुरु झाले. तेव्हा रहिवासी आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारी वाढल्याने कारवाईचे नाटक करण्यात आले आणि त्यानंतर हे तीन गाळे उभे राहिले. या संदर्भात स्थानिक वर्तमानपत्रांनी आवाज उठविल्यानंतर शनिवारी या गाळ्यांवर ठाणे महापालिकेने कारवाई करून सदर गाळे जमिनदोस्त केले. ठाणे महापालिकेने पहिल्यांदाच अशाप्रकारचे बांधकाम जमिनदोस्त केले आहेत. मात्र भविष्यात या ठिकाणी पून्हा बांधकाम होणार नाही याबाबत मात्र कोणतीही शाश्वती देता येत नसल्याची खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
ठाणे महापालिका परिसर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा अड्डा झाला आहे. जिथे जागा दिसेल तिथे तात्काळ बांधकामांना सुरुवात होत आहे. यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. किंवा लॉकडाऊनचाही यावर कोणताही परिणाम नाही. अतिशय कमी कालावधीत अगदी तीन महिन्यामध्ये सात सात माळ्याच्या इमारती उभ्या रहात आहेत. भूमाफिया, पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित युतीमुळे ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे.
0 टिप्पण्या