ठाणे : महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले “एकला चलो रे'चा नारा देत संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करित आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसपक्षातील मरगळ दूर होण्यास मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी गटागटात विभागलेल्या काँग्रेसला एकत्र कसे करायचे हा मोठ्ठा प्रश्न आज महाराष्ट्र अध्यक्षांपुढे निर्माण झाला असल्याचे काही जुन्या जाणत्या नेत्यांचे म्हणणे आहे. ज्यामध्ये सर्वात मोठे उदाहरण ठाण्याचे आहे. या शहरात सुरुवातीला काँग्रेसची सत्ता होती. एकेकाळी काँग्रेसचा ठाणे शहरासह जिल्ह्यात चांगला बोलबाला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उफाळलेल्या गटबाजीने नव्या नेत्यांची फळी उभी राहिली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष अक्षरशः रसातळाला गेला. आमदार, खासदारांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे संख्याबळ ठेवणाऱ्या काँग्रेसला आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी आहेत. एक खासदार राज्यसभेवर आहेत ते सोडले तर जिल्ह्यात काँग्रेसचा आमदार आणि खासदार सद्य:स्थितीत एकही नाही.
दरम्यान ठाणे काँग्रेसमध्ये आतापर्यंत कोणालाही पैसे देऊन दाहर अध्यक्षपद मिळालेले नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये कदर केली जाते. त्यामुळे दीड कोटी रुपये दक्षिणा दिल्याने कुणी अध्यक्ष होईल, अश्या वावड्यांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिले. आमच्या पक्षात कोणत्याही प्रकारे पैसे देऊन शहराध्यक्षपद मिळत नाही. निष्ठावान कार्यकर्त्यांची पक्षात नेहमी कदर केली जाते. पक्षाने ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास दाखवला त्या पद्धतीने मी शहराध्यक्षपद भूषविले आहे. यापुठे देखील पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना शहराध्यक्षपद मिळेल, असा विश्वास विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या