अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी

ठाणे 

माझी वसुंधरा अभियानातंर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून सन 2020-21 मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी सबंधित पंचतत्वावर आधारित घेण्यात आलेल्या स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेने प्रथम स्थान पटकावले. शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी ॲानलाईनद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या  स्पर्धेत 43 शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यामधीन  अमृत शहरांच्या गटामध्ये ठाणे महापालिकेला सर्वोत्तम कामगिरी करणारे शहर म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.  

 5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, माझी वसुंधरा अभियान संचालयानाच्या वतीने करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार,  पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे, महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सौ. मनिषा म्हैस्कर व महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिका या ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात  ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, उपनगरअभियंता अर्जुन अहिरे, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठामपाचे अभिनंदन करताना म्हणाले, माझी वसुंधरा अभियानात ठाणे महापालिकेने अमृत शहरे या विभागात प्रथम क्रमांक पटकावला, हे कौतुकास्पद आहे. त्यासाठी समस्त ठाणेकरांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, सर्व पदाधिकारी, आयुक्त डॉ. विपिन शर्मा व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ही कामगिरी शक्य झाली आहे. त्याचप्रमाणे, द्वितीय क्रमांक पटकावणारी नवी मुंबई महापालिका आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुंबई महापालिकेचेही मनःपूर्वक अभिनंदन भूमी, जल, वायू, अग्नि आणि आकाश या आपल्या पंचमहाभूतांना आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असून पृथ्वीवरील पर्यावरणाशी, पर्यायाने आपल्या अस्तित्वाशीच ती जोडलेली आहेत. त्यामुळे त्यांची जपणूक करणं, रक्षण करणं, संवर्धन करणं आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. विकास हा पर्यावरणाला पूरक असला पाहिजे, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कटाक्ष आहे. याच विचारातून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षीपासून हे अभियान राबवण्यास सुरुवात झाली. आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध विभागांमध्ये विजेते ठरलेली अमृत शहरे, नगरपालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायती या सर्वांचंच मनःपूर्वक अभिनंदन. 

 माझी वसुंधरा अभियानातंर्गत अमृत शहरे, नगरपालिका, नगरपरिषदा व पंचायत या एकूण 686 संस्थांमध्ये स्पर्धा झाली. भूमी, जल, वायू, अग्नि, आकाश या पंचत्तवामध्ये दिनांक 1 जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आले. वृक्षलागवड, जलसंवर्धन, हवाप्रदुषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, उर्जाबचत व पर्यावरणबाबत जनजागृती याबाबतच्या कामांचे मूल्यमापन करुन ते ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून शासनाला सादर करण्यात आले होते.  यामध्ये ठाणे महानगरपालिकेची सर्वोत्तम 10 शहरांमध्ये निवड झाली होती.  पुन्हा शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने महापालिकेने केलेल्या कामांचे मूल्यांकन करण्यात आले. या दोन्ही टप्प्यात ठाणे महापालिकेची कामगिरी अव्वल ठरली व अमृत सिटी म्हणून ठाणे महापालिकेस प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तर द्वितीय क्रमांक नवीमुंबई महानगरपालिका, तृतीय क्रमांक बृहन्मुंबई महानगरपालिका यांना तर प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पुणे महापालिकेला तर  द्वितीय उत्तेजनार्थ  परितोषिक विभागून बार्शी व नाशिक महानगरपालिका यांना  देण्यात आले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA