भिवंडी - एकीकडे ब्लॅक फंगसमुळे आरोग्यव्यवस्थेवर ताण पडला आहे तर दुसरीकडे कोरोना महामारीची दुसरी लाट लहान मुलांवर परिणामकारक ठरणारी असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत दुर्लक्ष करून भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातील शाळकरी मुलांना एकात्मिक बालविकास विभागामार्फत किडका आणि बुरशीजन्य आहार पुरवण्यात येत असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खिचडी ,अंडी ,दूध ,केळी आदी पौष्टिक आहाराचा समावेश असलेले अन्न येथील शाळकरी मुलांना देण्यात येते. मात्र तालुक्यातील चिंचवली - खांडपे येथील शाळकरी मुलांना पुरवण्यात येणारे चणे हे किडके व बुरशीजन्य असल्याचे निदर्शनास आल्याने शालेय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या किडक्या व बुरशीजन्य चण्यांची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना जाब विचारला.
भि
वंडी तालुका शहर अध्यक्ष सागर देसक,सचिव मोतीराम भाऊ नामकुडा,तालुका सेवादलाचे कार्यवाह प्रमुख ललित शेळके,उपप्रमुख रोहित नामकुडा,वडपे झोनसचिव सुनिल धापशी, कार्यकर्ते भास्कर जाधव इत्यादी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शाळेत जाऊन त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय सोनावणे यांच्याकडे जाऊन तपासणी केली. त्यावेळी पुरवठा करण्यात आलेले चणे हे किडके व बुरशीजन्य असल्याचे निदर्शनास आले..त्यामुळे विद्यार्थ्यांना चण्यांचा पुरवठा तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले. सदरचे पोषण आहार अकोला येथून स्टार इंटरप्रायजेस अकोला येथून पुरवला जात असल्याचे समोर आले असून या पुरवठादार एजन्सीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांच्याकडे श्रमजीवी संघटनेचे शहराध्यक्ष सागर देसक यांनी केली आहे.
0 टिप्पण्या