लॉकडाऊन ; पोलिसांची दर्यादिली

 औरंगाबाद येथील आंबेडकर चौकात सिडको पोलिस ठाण्याचे कर्मचारी बुधवारी नाकेबंदीवर भर उन्हात उभे होते. तेव्हा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतील एक महिला तीन लेकरांसोबत त्यांच्याकडे आली. माझी लेकरं उपाशी आहेत, मला मदत नको. पण हाताला काहीतरी काम द्या, अशी विनंती तिने केली. डोळ्यातून अश्रूूच्या धारा निघत असलेली महिला लेकरांसाठी मदत मागत असल्याचे पाहून पोलिसही हळहळले. 

पोलिस नाईक प्रकाश भालेराव यांनी काही विचारण्याआधीच तिने रडत रडत कृपा करून मदत करा, मी हात जोडते, अशी विनंती केली. भालेराव यांनी तिला न घाबरता बोल, असे म्हणत विश्वास दिला. तेव्हा तिने तिची कर्मकहाणी सांगितले. पाच वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मात्र, कोरोनामुळे घरकाम बंद झाले. नंतर मिळेल ते काम करून तिने कसाबसा उदरनिर्वाह चालवला. मात्र, मागील काही दिवसांपासून किराणा सामानासाठीही तिच्याकडे पैसे उरले नाही.

यावेळी बंदोबस्तावर उपनिरीक्षक अवचार, सहायक फौजदार हिवराळे, सुरेश भिसे व इतर नऊ कर्मचारी होते. भालेरावांनी तत्काळ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना कल्पना दिली. त्यांनी तिला सर्वतोपरी मदत करा, असे सांगत नाकेबंदीतून काही जणांना सूट दिली. मग भालेराव आणि इतरांनी वर्गणी करत पंचेचाळीस किलो किराणा सामान घेऊन तिला दिले. गिरी यांच्या सूचनेवरून तिला रिक्षातून हिनानगरातील घरीही नेऊन सोडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad