Top Post Ad

१ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता

  मुंबई: राज्यातून करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्यासोबत ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने तसेच म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या सर्व बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली.  राज्यात करोना रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्णसंख्या कमी कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे.

 मात्र आपल्याला अजून काळजी घेणे भाग आहे, असे मंत्रिमंडळाचे मत बनले आहे. राज्यात करोनासोबतच म्युकरमायकोसिस या आजाराचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे त्याबाबतही खबरदारी घ्यावी लागणार आहे. म्हणून राज्यात एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवून मग हळूहळू टप्प्याटप्प्याने निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात यावी. प्रथम आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करण्यात यावेत, अशीही मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागास लगेचच निर्देश दिले असल्याचे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर जी माहिती मिळाली आहे ते पाहता लॉकडाऊन १ जूननंतरही कायम राहणार हे निश्चित झाले आहे. त्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले जाणार हेसुद्धा स्पष्ट असून नेमकी कोणती मुभा मिळणार आणि कधीपासून मिळणार, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत ३० किंवा ३१ मेच्या आसपास नवा आदेश जारी होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच निर्बंध १ जूननंतरही लागू राहणार का, नवा आदेश किती दिवसांसाठी असेल?, जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर रेड झोन वगळता उर्वरित भागात हे निर्बंध काही प्रमाणात शिथील होणार का, हे सर्व प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. मुंबई, ठाणे, पालघर हे जिल्हे रेड झोनमध्ये नाहीत. त्यामुळे निर्बंध शिथील झाल्यास या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यातील २१ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १० टक्क्यांवर आहे. त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. १ जूननंतरही हे निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं आहे, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यातील ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होत आहे त्या जिल्ह्यांत १ जूननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात येतील, असे यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेड झोनमधील जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांना थोडासा दिलासा मिळणार हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यांत नेमके कोणते निर्बंध उठवले जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. राज्यात सध्या १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू असून त्याआधी नवा आदेश जारी केला जाईल. येत्या काही दिवसांत नव्या आदेशासोबत गाइडलाइन्स जारी होतील, असेही टोपे यांनी नमूद केले.

राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १४ एप्रिलपासून लॉकडाऊनसारखे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. या निर्बंधांनंतरही बाजारातील गर्दी कमी होत नसल्याने आठवडाभरातच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यांपासून हे निर्बंध लागू असून सर्व बाजारपेठा, आस्थापना व अन्य व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे नोकरदार व व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यात आता १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार असल्याने कोंडी कायम राहणार आहे. व्यापारीवर्गाने तर लॉकडाऊन न उठल्यास १ जूनपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला आहे. या सर्व रोषाला राज्य सरकारला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान आज झालेल्या  महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण  बैठकीमध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात पहिला म्हणजे, तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीलगत झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय झाला आहे. तर चंद्रपुरात लावण्यात आलेली दारुबंदी उठवण्यात आली आहे. चंद्रपुरात होणाऱ्या दारुच्या अवैध तस्करी आणि काळा बाजार थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. लोकांची सातत्याने होत असलेली मागणी, दारूबंदीचे दुष्परिणाम आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारूची होत असलेली तस्करी पाहता दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com