तर सर्वसामान्य नागरिकांना सुविधा कशा मिळणार

 


कल्याण
कोरोना महामारीचे रौद्ररूप दिवसेंदिवस वाढत असल्याच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमातून येत आहेत. देशभरात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या वर्षभरापासून कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल काकडे यांनी कोरोना समुपदेशन समितीची स्थापना करून नागरिकांमध्ये विविध प्रकारे जनजागृती करण्यास सुरवात केली. यामध्ये मास्क वापरण्यास सांगणे, रक्तदान करणे, प्लाझ्मा दान करणे, रुग्णांना बेड्सची व्यवस्था करून देणे आदी विविध कामे समिती करत आहे. हे करत असतांनाच कल्याण डोंबिवलीतील लसीकरण केंद्रांवर नागरिकांना काय सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत हे तपासण्याचे आवाहन त्यांनी सोशल मिडीयावर एका पोस्टद्वारे केले. यामध्ये प्रत्येकाने लसीकरण केंद्रास भेट द्यावी. त्याठिकाणी नागरीकांकरीता सावलीची काय व्यवस्था आहे. तसेच बसण्यासाठी पुरेशा खुर्च्या आहेत का याची माहिती घ्यावी. त्याची माहिती समितीला द्यावी असे नागरीकांना आवाहन केले होते. 

ही पोस्ट काकडे यांनी काल बुधवारी दुपारी टाकली होती. या पोस्टची आयुक्तांनी दखल घेत ही पोस्ट नागरीकांना भडकविणारी असल्याचे सांगत पोलिसांकडे तक्रार केली आहे. सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना भडकवल्याची तक्रार कडोंमपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलिसांत केली असून याप्रकरणी पोलिसांनी अनिल काकडे यांचा जवाब नोंदविला आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी काकडे यांना बोलावून त्यांच्या विरोधात आयुक्तांची तक्रार आहे असे सांगितले. त्यानुसार काकडे यानी त्यांचा जबाब पोलिसांना लिहून दिला आहे. या पोस्टद्वारे नागरीकांना भडकविण्याचा उद्देश नव्हता. समिती गेल्या वर्षभरापासून नागरीक आणि प्रशासनाला मदत करीत आहे. कोरोना जनजागृतीचे काम करीत आहे. सावली नसल्यास मांडव आणि पुरेशा खुर्च्या नसल्यास त्या उपलब्ध करुन देणार या उद्देशाने ही पोस्ट केली असल्याचे काकडे यांनी सांगितले. या प्रकारानंतर नागरिकांमध्ये जनजागृती करणे, पालिकेच्या सोयी सुविधांचे वास्तव मांडणे हे पालिका आयुक्तांच्या जिव्हारी लागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना सुविधा कशा मिळणार असा सवाल नागरिक करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad