पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आघाडीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. आज सकाळी नितीन राऊत म्हणाले होते की, "आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाची बैठक होईल. या बैठकीत जो निर्णय होईल, तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वी पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि 7 मे रोजी काढण्यात आलेला जीआर रद्द झाला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका असणार आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेही या बैठकीला उपस्थित राहतील. चर्चेतून जो निर्णय होईल त्यावरुन पुढची दिशा ठरवली जाईल."
पदोन्नतील आरक्षण या विषयावर कॅबिनेट बैठकीत आज चर्चा झाली. या विषयावर आता समन्वय समितीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या विषयांवर समन्वय समितीत चर्चा होते. तिन्ही पक्षातील प्रमुख मंत्री या समितीत आहेत. या समितीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील शिवसेनेकडून सुभाष देसाई, अनिल परब आहेत.
0 टिप्पण्या