ठाणे शहरातील रुग्णांची संख्या कमी होण्याच्या प्रमाणात वाढ


 ठाणे :  शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ९२.३ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  महापालिका हद्दीतील विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १०९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख १२ हजार १४७ जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण ९२.३ टक्के आहे. रुग्णालयात आणि घरी सात हजार ६०५ जणांवर उपचार सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत १५ लाख ४० हजार २१५ ठाणेकरांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख २० हजारपेक्षा जास्त जण कोरोनाबाधित मिळाले आहेत.

महापालिका क्षेत्रामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये येत असलेल्या घोडबंदर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून या भागात दररोज आढळणारी रुग्णसंख्या ६०० वरून १३० वर आली आहे. यामुळे या भागातील परिस्थिती आटोक्यात असली तरी हा परिसर आजही शहरात रुग्णसंख्येत आघाडीवरच असल्याचे दिसून येत आहे, तर मुंब्रा परिसरात सर्वात कमी रुग्ण आढळून येत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला. सुरुवातीला शहरात दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळून येत होते. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच सहाशेहून अधिक रुग्ण घोडबंदर भागात आढळून येत होते. या भागातील मोठय़ा गृहसंकुलांमध्ये करोनाचा शिरकाव झाला होता. तसेच हा परिसर करोना संसर्गाचे केंद्र बनल्याचे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून आता दररोज ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर घोडबंदर भागातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून या ठिकाणी आता दररोज १३० ते १५० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे या भागातील परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. 

घोडबंदरच्या तुलनेत शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांत करोनाचा संसर्ग कमी असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी हे परिसर करोना संसर्गाचे केंद्र बनल्याचे चित्र होते. त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मुंब्रा परिसरात सर्वात कमी रुग्ण आढळून येत असून या ठिकाणी मंगळवारी केवळ सहा रुग्णच आढळले होते.

याबाबत माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर म्हणाल्या,  घोडबंदर भागामध्ये गेल्या काही वर्षांत लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू असून या ठिकाणी बांधकाम मजूर राहतात.  या भागात करोना चाचणीचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे शहरातील इतर भागांच्या तुलनेत या ठिकाणी रुग्ण जास्त होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात रुग्णसंख्या कमी झाली आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आमचे पथक पोलिसांसोबत परिसरात गस्ती घालत असते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या