Top Post Ad

औषधी वनस्पतींच्या लागवडीसह रिसर्च सेंटर उभारण्याचा विचार करा - पालकमंत्री

 गडचिरोली : -  राज्य सरकारने नुकताच मोहफुले गोळा करणे, बाळगणे आणि त्याची वाहतूक करण्यावरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मोहफुलापासून पौष्टीक बिस्कीटे बनवण्याच्या उद्योगात कसे समाविष्ट करता येईल याचा विचार व्हावा. त्यासोबतच जिल्ह्यातील कोरची येथील जांभूळ देखील प्रसिद्ध आहे. त्याचे सुनियोजित मार्केटिंग करुन त्याला नागपूरची बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी, तसेच मधुमेहींसाठी लाभदायक असलेल्या जांभळाच्या बीयांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग कसा वाढवता येईल,  गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहफुलांवर प्रक्रिया करुन लाडू, बिस्कीट तयार करण्यास प्राधान्य देऊन त्याचा समावेश शालेय पोषण आहारात कसा करता येईल याचा विचार करण्याची सूचना राज्याचे नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. गडचिरोली जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठक आज व्हिसीद्वारे पार पडली. या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

केवळ पारंपारिक शेती न करता औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड वाढवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, तसेच या औषधी वनस्पतींवर अभ्यास करण्यासाठी रिसर्च सेंटर सुरू करण्याचा विचार करावा. ड्रॅगनफ्रुट, स्ट्रॉबेरी सारखी जास्त उत्पन्न देणारी उत्पादने घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कृषी विभागातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यासोबतच जिल्ह्यातील रिक्त पदांचा विषय लवकरात लवकर सोडवण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला आश्वस्त केले.

 कर्जत येथील  शेखर भडसावळे यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या प्रकल्पाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. धान्य साठवणुकीसाठी लागणाऱ्या गोडाऊन्सची क्षमता वाढवण्यासाठी जिल्ह्यात १३ गोडाऊन उभारणीसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन निधीतून देण्यात आलेला आहे. त्याचा आढावा घेऊन हे काम लवकर पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी केली. पीक विमा योजनेत सध्या ३४ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तेलगंणा मधून गडचिरोली मध्ये खते आणणे सोयीचे आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेऊन येणारी अडचण सोडवण्याची तयारी पालकमंत्र्यांनी यावेळी दाखवली. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बी बियाणे उपलब्ध करुन देणे, जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीचं प्रमाण वाढवून गडचिरोली जिल्ह्याला 'सेंद्रीय शेतीचा जिल्हा' अशी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com