नोटीस देऊनही खासगी रुग्णालयांचे अग्निसुरक्षा यंत्रणेकडे दुर्लक्ष


 ठाणे : 
मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात आग लागल्यानंतर गुदमरून चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील रुग्णालयांचा अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली. या घटनेनंतर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचे आदेश दिले. मात्र नोटीस देऊनही अद्याप ६५ खासगी रुग्णालयांनी अग्निसुरक्षा यंत्रणा बसवलीच नसल्याची धक्कादायक माहिती अग्निशमन विभागाच्या पाहणीमधून समोर आली आहे. या रुग्णालयांना यंत्रणा बसवण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतरही दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे अग्निशमन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान, प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर शहरातील ३४७ रुग्णालयांना पुन्हा एकदा फायर ऑडिटच्या नोटिसा बजावण्याचे सोपस्कार अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचे काम सुरु केले होते. त्यामध्ये २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्याचे समोर आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असल्याचे तर, ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. 

या ६५ रुग्णालयांना नोिटसा बजावून अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने दिले होते. मात्र, त्याकडे या रुग्णालयांनी अद्यापही दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या ६५ रुग्णालयांनी महापालिकेचे आदेश धाब्यावर बसवत अजूनही त्यांच्या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसवली नसून नसल्याचे उघड झाले आहे. सात दिवसांत जर यंत्रणा बसवण्यात आली नाही तर मात्र अशा रुग्णालयांवर कारवाई निश्चित करण्यात करण्यात येणार असून ही कारवाई कशा पद्धतीने करण्यात येईल याबाबत विचार सुरु असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिली.

ठाण्यात सरकारी, पालिका रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास आहे. याशिवाय, शहरात ३४७ खासगी रुग्णालये आहेत. राज्यात रुग्णालयांमध्ये आग लागून त्यात रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत. मुंब्य्रातील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयामध्ये आग लागल्यानंतर रुग्ण हलविताना चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

अग्निशमन विभागाने केलेल्या पाहणीमधून शहरातील ३५ रुग्णालये बंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित २८५ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले असले तरी या सर्वच रुग्णालयांना पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या