नुकसानग्रस्त झालेल्या वास्तूंची दुरूस्तीसंबंधी आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी


ठाणे जिल्ह्यातील तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी उन्मळून पडलेली झाडे, घरांचे पत्रे उडून झालेलं नुकसान आणि उध्वस्त झालेल्या फळबागांची त्यांनी पाहणी करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले.

 ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील ग्रामीण भागात असलेल्या चिरड गाव, शेलार पाडा, तसेच वांगणी येथील काराव येथील फळबागांच्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला. त्यासोबतच अंबरनाथ शहराला लागून असलेल्या फणशीपाडा आणि बारकूपाडा या झोपडपट्याची चक्रीवदळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी या भागाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांनीही या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.  चक्रीवादळामुळे या भागातील भूमीपुत्रांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. मोठं मोठी झाडे उमळून पडली होती. याशिवाय काही घरांचे पत्रे पडून घरातील लहान मुल जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व घरांची पाहणी करून या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची डागडुजी करण्याचे निर्देश  शिंदे यांनी दिले आहेत. 

दरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे उद्भवलेली आपत्तीजन्य परिस्थिती आणि झालेली अतिवृष्टी यामूळे नुकसानग्रस्त झालेल्या घर, वाडे, गोठे, इमारती इत्यादी वास्तूंची तात्काळ दुरुस्ती आणि पुर्नबांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आस्थापना अत्यावश्यक सेवा मानून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आस्थापना सुरू ठेवण्याचा कालावधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निश्चित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. सध्या कोविडमुळे सर्वत्र कठोर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सोडून सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्याला बसला असल्यामुळे दुरूस्तीसंबंधी आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हाधिका-यांनी दिली आहे. या आस्थापना स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या वेळेत ३१ मे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA