... आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव बाबासाहेबांनी केला उद्ध्वस्त


 संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापूर्वी मुंबई कोणाची? गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला असताना तमाम बुद्धिजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भूमिका मांडत होते. तेव्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राचीच असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले.  बाबासाहेबांनी 1948,1953 आणि 1955 साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली. मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची, तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूया.

बाबासाहेबांनी त्यांच्या समोर नऊ प्रश्न उभे केले.
1) मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?
2) मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?
3) मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?
4) काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?
5) मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकटय़ा महाराष्ट्राचे नाही, तर ते सर्व हिंदुस्थानचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?
6) मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?
7) मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट्र मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?
8) बहुभाषिक राज्य चांगले असते. कारण तिथे अल्पसंख्याक भाषिकांना अभय असते हे बरोबर आहे काय?
9) राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की, गुजरातवर मराठय़ांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की, मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मधला काही काळ मुंबई मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.
बाबासाहेब पुढे म्हणतात, 1941 च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या 51 टक्के होती, आहे. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱया हिंदुस्थानातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की, गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत, तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले तसे गुजराती आलेले नाहीत, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ-दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱयांबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. 1671 सालचे म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गोदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली. व्यापारात कर सवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले. तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत. याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.

मुंबईत जसा त्यांनी व्यापार-उदीम केला तसाच तो त्यांनी कोलकत्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्या खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कोलकता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?
मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो? गुजरात की महाराष्ट्र?
ज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते? महाराष्ट्रातून की गुजरातमधून?
कामगार शक्ती कुठली आहे?
आणि म्हणून वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच. अशा रीतीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. 

 पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तिवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जसे हुतात्म्यांचे, चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणाऱया बाबासाहेब आंबेडकर यांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने ठेवायला हवी.

दैनिक सामना ( २८ जानेवारी २०२१) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1