Top Post Ad

कोव्हिड कॉलसेंटरमुळे होम क्वारंटाइन रुग्णांना दिलासा

  कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या (होम क्वारंटाइन व होम आयसोलेशन) लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने 21 एप्रिलपासून सुरू केलेल्या कॉल सेंटरमुळे ठाणेकरांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असून शेकडो रुग्णांना गंभीर (क्रिटिकल) अवस्थेत जाण्यापासून रोखण्यात यश मिळाले आहे. पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कॉलसेंटरच्या माध्यमातून आता कोरोनातून बरे झालेले रुग्ण, तसेच लसीकरण झालेल्या नागरिकांचेही ट्रॅकिंग करून त्यांचे कौन्सिलिंग केले जाणार आहे.

      मार्चच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यापेक्षा घरीच राहून उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल अधिक होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांपेक्षा होम आयसोलेशन व होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या अधिक होती. या रुग्णांचे व्यवस्थित ट्रॅकिंग व्हावे, त्यांना वेळच्या वेळी योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा आणि त्यांना गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखण्याबरोबरच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, या हेतूने पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले. या माध्यमातून घरी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना दररोज कॉल करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबरच रुग्णांनी मागणी केल्यास महापालिकेच्या डॉक्टरांशी जोडून दूरध्वनीवरून वैद्यकीय सल्ला, तसेच औषधोपचारांबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच, महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक औषधेही उपलब्ध करून दिली जात आहेत. यामध्ये दिवसाला सरासरी ४००० कॉल्स होतात.

     रुग्णांशी अशा प्रकारे संवाद साधताना एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासल्यास कोव्हिड वॉर रूमच्या माध्यमातून कोव्हिड केअर सेंटरमध्ये संबंधित रुग्णांना दाखल केले जात आहे. अशा प्रकारच्या तात्काळ प्रतिसाद व्यवस्थेमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण होता. सर्वसाधारण बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर आदी सुविधा, तसेच रेमडेसिवीरसारखे औषध मिळण्यात अनंत अडचणी होत्या. अशा परिस्थितीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या सुमारे पाच ते सहा हजार रुग्णांचे योग्य ट्रॅकिंग होऊन त्यांना मार्गदर्शन मिळाले नसते तर त्यांची तब्येत खालावून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली असती. अशा परिस्थितीत रुग्णालयांवरील ताणही वाढला असता आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागण्याचीही शक्यता होती.     त्यामुळे कॉल सेंटरमुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत असून आरोग्य यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.    महापालिकेची कोव्हिड वॉर रूम, महापालिकेच्या सेवेतील डॉक्टर्स आणि शहरातील काही नामवंत डॉक्टर्स यांच्या समन्वयाने या कॉलसेंटरचे काम प्रभावीपणे सुरू आहे.

     पोस्ट कोव्हिड रुग्ण, लसीकरण केलेल्या नागरिकांचेही ट्रॅकिंग कोरोनाची दुसरी लाट आता काहीशी ओसरताना दिसत आहे. मात्र, एप्रिल महिन्यातील कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आता कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांमध्ये कोव्हिडोत्तर त्रासाची लक्षणेही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. तसेच, आता म्यूकरमायकोसिस या दुर्मीळ बुरशीजन्य आजाराचाही धोका वाढत आहे. त्यामुळे आता कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांचीही पुढील काही दिवस कॉल सेंटरच्या माध्यमातून विचारपूस केली जाणार आहे.     तसेच, सध्या लसीकरणाची मोहीम सुरू असून लस घेतलेल्या नागरिकांनाही सुरुवातीचे दोन दिवस विविध प्रकारचे त्रास जाणवू शकतात. त्यांनाही या काळात वैद्यकीय सल्ल्याची गरज भासू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण केलेल्या नागरिकांचेही कॉल सेंटरच्या माध्यमातून कौन्सिलिंग केले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com