भाजपचे खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून बाळ्या मामा जिल्ह्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहेत.शिवसेनेत असतांनाही बाळ्या मामा यांनी २०१९ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते.त्यामुळे शिवसेना - भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे शिवसेना पक्षश्रेष्ठींनी बाळ्या मामा यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती.त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर मात्र कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. मात्र २०१४ साली काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सुरेश टावरे यांना बाळ्या मामा यांच्या राजकीय मदतीचा फायदा घेता आला नाही आणि त्यामुळे काँग्रेसला भिवंडी लोकसभा मतदार संघावर पाणी फेरावे लागले.भिवंडी लोकसभा मतदार संघात मुस्लिम मतदार जास्त असून या मतदारांचा काँग्रेसपक्षाच्या उमेदवाराकडे मतदान करण्याचा कल जास्त असतो.त्यातच भिवंडी ग्रामीण भागात बाळ्या मामा यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
भिवंडी लोकसभेत असलेल्या भिवंडी , शहापूर , मुरबाड , कल्याण या मतदार संघात म्हात्रे यांचा आजही चांगला दबदबा व दरारा आहे.शहरातील मुस्लिम मतदार व ग्रामीण भागात असलेला बाळ्या मामा यांचा चाहता वर्ग या सर्वांचाच फायदा सुरेश म्हात्रे काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेस पक्षाला होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनेते देखील या बाबत सकारात्मक असून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना काँग्रेस पक्षात घेण्यास उत्सुक झाले आहेत. बाळ्या मामा यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भिवंडी शहरात वाताहात झाकलेल्या काँग्रेस पक्ष उभारी घेणार असून आगामी भिवंडी महापालिका निवडणुका , पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांबरोबरच भिवंडीतील पूर्व व पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यातच काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते सध्या बाळ्या मामा यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एकंदरीत सुरेश म्हात्रे यांच्या काँग्रेसपक्ष प्रवेशाने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.भाजपकडे असलेला भिवंडी लोकसभा मतदार संघ खेचण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या हालचाली देखील वाढल्या आहेत.सुरेश म्हात्रे नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या