
दिवा शहरातही रस्त्यावर पाणी साचले होते, तर भिवंडीमध्येही वृक्ष उन्मळून पडले होते. शिळफाटा मार्गावर देसाई नाका परिसरात एक मोठे होर्डिंग टेम्पोवर कोसळले. या घटनेत सचिन चव्हाण (३५) आणि छबन चौधरी (४५) हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक सहावर उन्नत विजेच्या तारेवर झाड कोसळले. त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर झाला. कल्याण, डोंबिवली शहरांच्या बाहेर खाडीकिनारा परिसरांत असलेल्या मोकळ्या जागेतील काही इमारतींवरील पत्र्यांचे निवारे वादळी वाऱ्याने उडून गेल्याचे दृश्य पाहण्यास मिळत आहे. अंबरनाथ शहरात गेल्या दोन दिवसांत ४२ झाडे उन्मळून पडली . कानसई, खेर सेक्शन, वडवली, बी केबिन रस्ता, हुतात्मा चौक, स्वामी समर्थ चौक, शिवगंगा नगर, लक्ष्मी नगर या भागात मोठी पडझड पाहायला मिळाली. बदलापूर शहरातही पूर्व आणि पश्चिम भागांत सात झाडे पडली होती. पडलेली झाडे हटवण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता दोन्ही शहरांचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात १२५ प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. बोईसर मंडल क्षेत्रात नऊ तासांत ११४, तर तारापूरला १२० मि.मी. पावसाची नोंद झाली. संध्याकाळीही पाऊस सुरूच होता. वादळी वारा व पावसामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले होते. सकाळपासून वीज नसल्याने इमारतींमध्ये राहणाऱयांचे पाण्याविना हाल सुरू होते. शेकडो घरांचे पत्रे उडून गेले. कोकणात रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावामुळे पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले.
सखल भागात पाणी साचल्याने आणि मोठ्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक मंदावली. रेल्वे ट्रँकवरदेखील झाडे पडल्याच्या घटना घडल्याने लोकल वाहतुकही काही काळ खंडित झाली आणि धावत्या मुंबईला ब्रेक लागला. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावरील विमानसेवा सोमवारी बंद ठेवण्यात आली. चेन्नईहून निघालेले विमान सकाळी ८.१५ वाजता सुरतच्या दिशेने तर लखनौवरून मुंबईला येणारे विमान अर्ध्या वाटेतून परत पाठविण्यात आले. जवळपास २०० विमान फेऱ्यांना वादळाचा फटका बसला.
0 टिप्पण्या