Top Post Ad

जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन

नांदेड-  अशोक चव्हाण पालकमंत्री असलेल्या नांदेड जिल्ह्यातील  मुदखेड तालुक्‍यात असलेल्या रोही पिंपळगाव येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने झालेला तणाव इतका शिगेला पोहोचला आहे की, त्या गावातील बौद्ध आणि इतर  समाजातील ३० हून अधिक कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यांना जिवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे.  मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी बंद करण्यात आली आहे. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या तरुणांकडून डेअरीत दूध खरेदी देखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला. 
सदरील घटनेची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते दीपक बळवंते याने सांगितले की, गावात द्वेष भावनेतून मध्यरात्री आम्हाला जीवे मारण्याची धमकी देण्यात  आली, शिवीगाळ करण्यात आली आहे.   इतका सर्व प्रकार होऊनही येथील पालकमंत्री अशोक चव्हाण यांना त्याचे अद्यापही काही सोयरसूतक नाही. स्वत:च्या मतदारसंघात गावगुंड जाणिवपूर्वक सामाजिक द्वेष निर्माण करीत असूनही याबाबत पालकमंत्री काहीही करत नसल्याने गावकऱ्यांनी सतंप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रोही पिंपळगावातील या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून महाराष्ट्राला कलंकित करणारा प्रकार असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.

बौद्ध समाज या राज्यात सुरक्षित नाही.  मागील पाच ते सहा महिन्यांपासून नांदेडमध्ये सातत्याने जातीयतेतून बौद्ध समाजावर हल्ले होत आहेत. आतापर्यंत अनेक बळी गेलेत. इतकेच नाही तरआधीच महामारीने ग्रासलेल्या समाजाला येथील गावगुडांनी संपूर्ण गावाचेच रेशनपाणी बंद करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मागील सहा महिन्यात गावगुडांच्या मार्फत झालेल्या या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्विकारून अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच या गावगुंडांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या बुद्धपौर्णिमेच्या पुर्वसंध्याकाळी अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर भिक्खूसंघ तसेच तमाम बौद्ध जनता आणि संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जयभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनी दिला आहे. 

  ऍट्रोसिटी गुन्हा दाखल झालेल्यांना त्वरीत अटक करावी, बौध्द वस्तीत बोअर पाठून द्यावा, येथील पोलिस चौकीत पोलिस तैनात करावा, जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी गायरान उपलब्ध करुन द्यावे, सामाजीक बहिष्कार विरोधी कायदा ३ जुलै २०१७ पासून महाराष्ट्रात लागु झाला आहे. तरी त्यानुसार कायदेशीर कारवाई करावी. तसेच बौद्ध वस्तीत महावितरणचा स्वतंत्र डीपी बसविण्यात यावा या मागण्यांसाठी रोहि पिंपळगाव येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.  राहूळ चिखलीकर, प्रा. राजू सोनसळे, अति ढगे, अभय सोनकांबळे, विनोद नरवाडे, भिमराव बुक्तरे, प्रा. राज अटकोरे, कपील वाठोरे, देवानंद क्षिरसागर, बापूराव केळकर, पांडूरंग केळकर, भगवान बसवंते, संजय हनमंते, अनिळ केळकर, समाधान निखाते, विठ्ठल हनमंते, रेखाबाई नरवाडे, शोभाबाई केळकर, अंजनाताई केळकर, छायाबाई  हनमंते, पुष्पाई हनमंते, अंजानबाई हटकर, अरुणाबाई क्षिरसागर यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

याप्रकरणी नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा सामाजिक बहिष्कार घडला. हा प्रकार लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने गावात पथक पाठवले. परिस्थिती चिघळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. शनिवारी पोलीस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत गावातील दोन्हीही समाजाची बैठक घेऊन समाजातील वितुष्ट दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापुढे सामोपचाराने आपापसातील वाद मिटवून घ्यावेत असेही प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी सांगितले. 

मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही बौद्ध तरुणांकडून जयघोष करण्यात आला. याचे निमित्त करून दुसऱ्या समाजातील तरुणांनी मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित समाजाने केला आहे. या प्रकरणानंतर तीन ज्ञात आरोपींसह अनेक अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी व भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून अख्ख्या गावानेच बौद्ध समाजावर बहिष्कार टाकला या प्रकरणानंतर तीन ज्ञात आरोपींसह अनेक अज्ञातांविरोधात अॅट्रॉसिटी व भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून अख्ख्या गावानेच बौद्ध समाजावर बहिष्कार टाकला.

या घटनेवर ‘दै. सकाळ’सह  ‘द वायर’ या न्यूजपोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. रोही पिंपळगावात 25 एप्रिल रोजी बौद्ध तरुणांनी एकत्र येत जयंतीनिमित्त बाबासाहेबांचा जयघोष केला. यावरून गावातील 30 हून अधिक तथाकथित  स्वंयघोषित सवर्णांनी दोन दिवसांनी एका बौद्ध तरुणाला पकडून जयंतीचा कार्यक्रम का घेतला म्हणून विचारणा केली. यात या तरुणासह एक वयोवृद्ध  महिलाही सामील होती. यावेळी दोघांनाही जातीवाचक शिवीगाळ व तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याविरुद्ध तरुणाने पोलिसांत रीतसर तक्रारही नोंदवली. यानंतर अख्ख्या गावानेच संतप्त होऊन गावातील 30 कुटुंबांवर बहिष्कार टाकला.

गावात दोन समाजांमध्ये तणाव झाल्यानंतर मेडिकल औषधे, जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, पिठाची गिरणी दलित समाजासाठी बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासोबत दूध व्यवसाय करणाऱ्या दलित तरुणांकडून डेअरीत दूध खरेदीदेखील बंद केल्याचा प्रकार या गावात घडला. या घटनेची माहिती मिळाल्यावर काही सामाजिक संघटनांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु त्याआधी जवळजवळ एक आठवडभर दलित समाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मागील महिन्यात देखील अशीच एक अन्यायकारक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शिवनी जामगा, ता. लोहा, जिल्हा नांदेड येतील संदीप दुधमल शेतावरुन साइकल वर घरी येताना वाटेमधे जातीयवादी दोघे मोटारसायकल वरून घरी येताना संदीप दुधमालच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने जाब विचारला की, तुम्ही मला का धडक मारली. तेंव्हा जातीयवाद्यानी खाली उतरून ये धेडग्या ये महर्ग्या अशी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण करण्यात आली. एवढ्यावर न थांबता जातीयवाद्यांनी घरी जाऊन 8 ते 10 जणांना कुराडी काठ्या घेऊन संदीप दुधमलच्या घरावर हल्ला केला. संदीपची आई, भाऊ, वडील, चुलता, चुलती बहीण याना घरात घुसून धेडग्यानो लय माजल्या काय? असे म्हणत मारहाण करण्यात आली.

ही मारहाण सुरू असताना हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश एडके या बौद्ध तरुणांच्या डोक्यामध्ये यातील एकाने कुऱ्हाडीचा घाव घातला, यात तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. घाव अतिशय खोल असून अतिशय गंभीर जखमी आहे. मृत्यूशी तो झुंज देत आहे. नांदेड शहरात तो ऍडमिट आहे. गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com