कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांची लूटमार

महापालिकेकडून बिल दिले जात नसल्याने रूग्णांकडून जादा पैसे वसुली


 ठाणे महापालिकेने माजीवडा येथील कॅपिटॉल हॉटेल आयसोलेशनसाठी अधिग्रहीत केले आहे. यासाठी प्रत्येक रुग्णाकडून 2 हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे पालिकेनं जाहीर केले होते. मात्र, या ठिकाणी साडेतीन हजार रुपये आकारले जात असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांनी उघडकीस आणले आहे. तर महापालिकेकडून आम्हाला आमचे बिल दिले जात नसल्याने नाईलाजास्तव रूग्णांकडून जादा पैसे घ्यावे लागत असल्याचं हॉटेलचे व्यवस्थापक निश्चल पुजारी याचं म्हणणं आहे.

 हॉटेल कॅपिटॉल हे कोविडचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षण नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खर्चाने तपासणी आणि उपचार करून घेण्यासाठी आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांसाठी प्रतिदिन रुपये 2 हजार इतका दर निश्चित करण्यात आला असून यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार असल्याचं महापालिकेनं जाहीर केले होते. त्यानुसार वृंदावन येथे राहणार्‍या एका महिलेने महेश इंगळे यांच्यामार्फत कॅपिटॉल हॉटेलमध्ये आयसोलेशन रुम नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. 

महेश इंगळे यांनी या हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथे उपस्थित असलेल्या महिलेने एका रुग्णासाठी साडेतीन हजार रुपये आकारण्यात येतील; जर एक खोली दोघांनी घेतली तर दोन हजार रुपये आकारण्यात येतील असे सांगितले. ठाणे महापालिकेने स्पष्टपणे प्रती रुग्ण 2 हजार रुपये दर आकारण्याचे निश्चित केले असताना या हॉटेलकडून जादा दर आकारुन गरजवंतांची लूटमार केली जात असल्याचे इंगळे यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी थेट हॉटेल गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. यावेळी इंगळे यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीमध्ये सामान्य लोकांची सर्वच स्तरावर लूटमार सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी लूटमार सहन करणार नाही. सामान्य रुग्णांची लूट करणार्‍या या हॉटेलवर पालिकेनं कारवाई न केल्यास महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा दिला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad