Top Post Ad

विरार रुग्णालय दुर्घटना , राज्य सरकारच्या मदतीव्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत


पालघर: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आज पालघर जिल्ह्यात आगीची भयंकर घटना घडली आहे.  विरारमधील तिरुपती नगरातील बंजारा हॉटेलच्या मागे विजय वल्लभ हॉस्पिटलच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात (ICU) मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली. आयसीयूधील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्यानं ही लागल्याची प्राथमिक माहिती आहे. वॉर्डात ऑक्सिजन असल्यानं आग लगेचच सर्वत्र पसरली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. आगीची घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ हालचाली करून काही रुग्णांना वाचवले. मात्र, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाच महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती वसई-विरार महापालिकेनं दिली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसरीकडं हलवण्यात आलं आहे.

रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मधील 17 पैकी 13 जण निलेश भोईर (वय ३५), उमा सुरेश कनगुटकर (६३), पुखराज वल्लभदास वैष्णव (६८), रजनी आर कडू (६०), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे(६३), नरेंद्र शंकर शिंदे (५८), रमेश टी उपयान (५५), कुमार किशोर दोशी (४५), शमा अण्णा म्हात्रे (४८), सुप्रिया देशमुख (४३), प्रविण शिवलाल गौडा (६५), अमेय राजेश राऊत (२३), सुवर्णा एस पितळे (६४)  दगावले तर अन्य 4 व अन्य रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याचे विजय वल्लभ रुग्णालय प्रशासनाचे डॉक्टर दिलीप झाह यांनी सांगितले. 

सर्वप्रथम रुगणालयातील जे इतर रुग्ण उपचार घेत होते त्यांना इतरञर हलवणे हे प्रथम कर्तव्य आहे. बाकी चूक कुणाची आहे. कोण जबाबदार या सर्व गोष्टी नंतर, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना सांगितले.

 या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातलगांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.  रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षित स्थलांतराला प्राधान्य देत त्यांनी काही रुग्णांना दहिसर येथील मुंबई महापालिकेच्या कोव्हीड सेंटर येथे हलवले तर अन्य रुग्णांना विरार मधीलच विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com