या को-वि-ड हॉस्पिटलच्या माध्यमातून काय लपविले जातेयं


 कोविड हॉस्पिटलची नितांत गरज असताना कौसा, कळवा येथील कोरोना हॉस्पिटल बंदच होते. त्यावेळी सामान चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. भाजपाने आवाज उठविल्यावर सामान उपलब्ध झाले. आता माजी खासदार पाहणीसाठी गेल्यावर त्यांना रोखण्यात आले. या कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून काय लपविले जातेयं, ही मोगलाई आहे का, असा संतप्त सवाल निरंजन डावखरे यांनी केला आहे. कळवा-मुंब्र्यात कोरोनाचा उद्रेक झाला असतानाही, कौसा आणि कळवा येथील बंद असलेल्या कोरोना हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी जबरदस्तीने रोखले. माजी खासदार किरीट सोमय्या, नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या पार्श्वभूमीवर डावखरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा आणि कौसा येथे म्हाडाच्या माध्यमातून कोरोना हॉस्पिटले उभारण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर ती तात्पुरती बंद करण्यात आली. आता दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही, दोन्ही हॉस्पिटले बंदच आहेत. त्यातच या हॉस्पिटलमधील साहित्य गायब झाल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली १५ कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना रेतीबंदर येथेच कळवा पोलिसांनी रोखले. आम्हाला वरिष्ठांचा आदेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांनी दुपारी अटक केली. त्यानंतर त्यांची सायंकाळी सुटका करण्यात आली. कोविड सेंटरमधील घोटाळा उघड होऊ नये, यासाठी आम्हाला पाहणी करण्यापासून रोखण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या, संजय वाघुले यांनी केला. मात्र, हा घोटाळा आम्ही उघड करणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या