Top Post Ad

दोन लॉकडाऊनमधून आपण काही शिकलो का ?


लोकांनी आता घरात असताना देखील मास्क वापरणे आवश्यक आहे असा एक नियम कदाचित काही दिवसांनी येणार आहे आणि परिस्थितीचा विचार करता लोकांना तो पाळावाच  लागेल. सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरु असताना यासाठी केवळ सरकारला जबाबदार ठरवणे हा आपला मुर्खपणा ठरेल. महाराष्ट्रातील तीन पायांचे सरकार हे सर्वत्र सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले हे मान्य केले तरीही दुसरे कोणतेही स्थिर सरकार असते तरीही यापेक्षा वेगळे चित्र दिसले असते अशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे उलटल्यावर देखील जनतेसाठी पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात सारेच पक्ष अपयशी ठरलेले आहेत व याला स्वतंत्र भारतातील आपण सारे नागरिक देखील जबाबदार आहोत. 

पहिला लॉकडाऊन संपताच लोकांचे बेजबाबदार बनलेले वर्तन हे दुसऱ्या लॉकडाऊनचे कारण ठरले ही गोष्ट मान्य करावीच लागेल. दादरच्या फुलबाजारातील वाढलेली गर्दी असू दे वा गावोगावी लग्नमंडपात श्रीमंतीचे आणि आम्ही कायदा मोडतो याचे झालेले प्रदर्शन ही समाजजीवनाची दुसरी बेशिस्त बाजू होती. हे सर्व पाहिल्यावर ब्रिटीश सत्तेबाबत शाळेत इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या अनेक गोष्टी आठवल्या. प्लेगच्या काळात जनता कायदा पाळत नसल्याने ब्रिटिशांनी केलेले अत्याचार वाचलेले होते, पण आज आपल्या स्वतंत्र भारतातील लोकांचे वर्तन पाहिल्यावर आणि विनाकारण कायदे मोडणाऱ्या लोकांच्या मृत्यूचे आकडे पाहिल्यावर आम्ही त्याच लायकीचे होतो का हा प्रश्न मनात उभा राहतोय. 

कोरोना ठिकठिकाणी अस्तित्वात असताना आणि सरकार विनाकारण माणसे जमवू नका म्हणून ओरडत असताना गावागावात चढाओढ लावत लग्नसमारंभ साजरे करण्यात आले. अंतर नियमांचे पालन सोडाच, पण २/३ हजार माणसे, एकावेळी एकाठिकाणी मास्क न लावता जमा झाली. पोलीस ठाणी मेनेज करण्यात आली. या सर्व लग्नसमारंभात नवरा-नवरी वगळता तसे कोणाचेही हित नव्हते व तो फक्त त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न होता जो सरकारच्या नियमात राहून साजरा करता आला असता. पण या दोन माणसांच्या आयुष्याचा समारंभ साजरा करत असताना २/३ हजार माणसांनी आपल्या घरातील लोकांचे आयुष्य धोक्यात आणले हा विचार त्या धुंदीत कोणाच्याही मनाला शिवला नाही. अशा लग्नाला जमलेल्या प्रत्येक माणसाने या लग्नानंतर आपले कोण बळी पडले, गावातील किती माणसे नाहक बळी गेली याचादेखील विचार मनापासून करावा. ज्या गावात आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत अशा गावांमध्ये दिखावा म्हणून २/३ हजार माणसांचे समारंभ आयोजित करणे व लोकांनी ते वेड्यासारखे साजरे करणे हा निव्वळ मुर्खपणा होता. असे लोक घरी परतताना सोबत कोरोनाचा प्रसाद घेऊन गेले, त्यांनी तो घरच्यांना वाटला आणि ते स्वत: वा त्यांच्या घरचे निष्पाप लोक बळी गेले. अशा घटना पाहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी फक्त सरकारला आणि विरोधी पक्षाला दोष देण्यात काहीही अर्थ उरत नाही. घरात असताना देखील मास्क वापरण्याची पाळी अशा बेजबाबदार लोकांमुळे घरच्यांवर येणार आहे. 

माझ्या लिखाणाचे कोणाला वाईट वाटले तरी मला त्याची खंत नाही. कोणीतरी या विषयावर बोलणे आवश्यक आहे, मी बोलतोय. आणि मी पोटतिडीकीने बोलतोय त्याला आणखी एक कारण आहे कोरोनाची येणार असलेली तिसरी लाट... 

कोरोना संपलेला नाही आणि तो इतक्यात जाणार देखील नाही. तज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट ही साधारण सप्टेंबर/ऑक्टोबरच्या दरम्यान यापेक्षा जोरात उफाळून येणार आहे. त्यावेळी देखील गौरी-गणपती, दिवाळी व लग्नसमारंभ हे पुन्हा सुरु होतील. त्यावेळी देखील मूर्ख जनता मागचा धडा विसरून पुन्हा अशा ठिकाणी मास्क न लावता, कायदे मोडल्याची हुशारी दाखवत दुसऱ्या वेळी केलेली घोडचूक पुन्हा करणार आहे. “साहेब, किती माणसे येणार सांगा, ‘बाकीच्या’ सगळ्या गोष्टी आमच्यावर सोडा” म्हणणारे निर्लज्ज कॅटरर्स व हॉलमालक गावोगावी पसरलेले आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले पोलीस दल राजकारण्यांसाठी दर महिन्याला कोट्यावधी रुपये जमा करण्याच्या नादात हफ्ते खाऊन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करेल हेही ठरलेले आहे. आणि काही मूर्खांच्या चुकीपायी पुन्हा आपणा सर्वांना कदाचित तिसऱ्या लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार आहे म्हणून लिहावं लागतय.  

काल त्रिपुरासारख्या एका दूरच्या राज्यात एका जिल्हा न्यायाधीशाने एका मोठ्या घरच्या पार्टीचा लग्नसमारंभ बंद पाडल्याचा व्हिडियो पाहिला. पोलिसांना व पोलीस ठाण्याला देखील त्याने सोडले नाही. तो व्हिडियो पाहिल्यावर त्या न्यायाधीशाचा अभिमान वाटला. २५/५० माणसांची परवानगी असताना शेकडो माणसे जमवून श्रीमंतीच्या जोरावर रात्री उशिरापर्यंत ऑर्केस्ट्राच्या तालावर नाचणारे गर्भश्रीमंत लोक त्या लग्नाला हजर होते. या बहाद्दराने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. आत्ताच भाजपाने त्याच्या निलंबनाची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. कायद्याचा बडगा उगारणाऱ्या त्या न्यायाधीशाची कदाचित बदली करतील, केस दाबून टाकतील, पण त्याने केलेले वर्तन हे कायद्याच्या चौकटीत व लाखो लोकांचा जीव वाचवणारे होते असे मी मानतो. 

गेल्यावर्षी तबलीघी मुसलमानांवर कोरोना फैलावल्याचे बिल राजकारण्यांकडून फाडण्यात आले. यावर्षी बंगालमधील निवडणुका आणि कुंभमेळा याठिकाणी झालेली गर्दी हिंदूंची होती म्हणून त्यांना देखील माफ करता येणार नाही. गेल्यावेळी इतर अनेक राज्यातील गावागावात कोरोनाचे नियंत्रण खूप चांगल्याप्रकारे झालेले होते. पण यंदा त्याच राज्यात अनेक गावे, अनेक वस्त्या कोरोनाच्या कचाट्यात आहेत. गर्दी करून शाहीस्नान केलेल्या धार्मिक अंधांना मेल्यावर शेवटचे स्नान नशीब होईल का हा प्रश्न आता मोठा बनलेला आहे. मुंबई व महाराष्ट्रातून आपापल्या गावी गेलेले परप्रांतीय आता पुन्हा इथे परततील का इतके भीषण चित्र गावागावात निर्माण झालेले आहे. आणि ही राज्ये व ही गावे तुलनेने मागास असल्याने या रुग्णांचे हाल भयानक होतील हे आजच्या घडीचे विदारक चित्र आहे.   

सरकारने आपली जबाबदारी झटकलेली आहे. आपले कुटुंब हे पुर्वीदेखील आपलीच जबाबदारी होते व आजदेखील आपलीच जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत जनता म्हणून आपल्याला आता आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. कोणत्याही स्थितीत विनाकारण गर्दीचा हिस्सा आपण बनणार नाही इतकी साधी काळजी आपण घेऊ शकतो. या गर्दीत वावरत असताना कितीही जवळचे लोक सोबत असतील तरीही विनामास्क न राहण्याची काळजी आपण घेऊ शकतो. आणि हे सारे आपल्याला सरकारसाठी नाही तर घरात आपली वाट पाहत असलेल्या आपल्या कुटुंबासाठी करायचे आहे. 

आणि हे करा, हे करू नका वगैरे कोणालाही समजवण्याची वेळ आता राहिलेली नाही. एकदा बळी गेलात कि तुमचं माणूसपण संपलं. एका गाडीत २२ बॉड्या भरून अंतिम संस्काराला पाठवल्याची बातमी आपल्याच राज्यातील आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित जगायचं का प्लास्टिकच्या पिशवीत भरून पाच माणसांसोबत जायचं हे ज्याने त्याने ठरवायचं आहे.    


एडव्होकेट प्रशांत साने 9029370600

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com