तर आतापर्यंत अनेक पेशंटची फसवणूक झाली असणार ; आमदार केळकर यांचा दावा

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी पैसे लागणे ही बाब अत्यंत संतापजनक असून या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना बेड्या घाला अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. कोरोनाने थैमान घातलं असताना महापालिकेच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडणे हे दुर्दैवी आणि चीड आणणारे आहे. अनेक प्रश्न याबाबत निर्माण होतात. बेड उपलब्ध करण्याच्या यंत्रणेत कोण कोण आहेत त्यांची तर चौकशी झालीच पाहिजे, पण वरपर्यंत कोणाचे हितसंबंध आहेत याचा शोध घ्यायला हवा तर आतापर्यंत अनेक पेशंटची फसवणूक झाली असल्याचा दावा केळकर यांनी केला. 

 अखेर आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे घेवून रूग्णास दाखल केल्यानंतर समाज माध्यमातून चित्रफीत प्रसारित होताच, महापौरांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने डॉ. अविनाश माळगावकर यांनी काल रात्री कापूरबावडी पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मे.ओमसाई आरोग्य केयर प्रायव्हेट लिमिटेड येथे कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत असणारे डॉ. परवेझ, नाजनीन, अबिद खान, ताज खान आणि अब्दुल गफार खान अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. रुग्णांना आवश्यकतेनुसार आयसीयु आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाच्या प्रवेशासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप वसईतील रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेतल्याने ठाणे ग्लोबल रुग्णालयात दाखल करून देतो असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad