मेट्रोच्या पिलरसाठी नाला बुजवला ; तक्रार करणाऱ्या नागरिकांना कंत्राटदाराची दमदाटी

 ठाणे 
-  आजपर्यंत मेट्रोकरिता अनेक वृक्षांचा बळी देण्यात आला. याबाबत अनेक वृक्षप्रेमींना आवाज उठवूनही पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. आता मात्र मेट्रोसाठी चक्क नालाच बुजवण्याचा प्रताप ठेकेदाराने केला असल्याचे उघड झाले आहे.  ठाण्यातील संभाजी नगरमध्ये मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्या भागात एक मुलगी वाहून गेली होती. त्याच ठिकाणी  मेट्रोचे काम करताना ठेकेदाराने चक्क नालाच  बुजवला आहे. त्यामुळे यावर्षीदेखील सदर ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकवेळा सदर ठेकेदाराशी बोलून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दमदाटी करुन नागरिकांना पिटाळून लावले जात आहे. त्यामुळे यंदाही या भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. . विशेष म्हणजे, महापालिकेच्या एकाही अधिकार्‍याला त्याचे सोयरसुतक नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

 मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये संभाजी नगर येथे एक मुलगी नाल्यामध्ये वाहून गेली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह कळवा खाडीमध्ये सापडला होता. तेव्हापासून येथील नागरिकांकडून हाय- वे खाली असलेल्या नाल्याच्या मोरीची साफसफाई करुन तो गाळमुक्त करावा, अशी मागणी केली जात होती. मात्र, सदर नाला गाळमुक्त करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असतानाच आता मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदाराने ही वस्तीच पाण्यात बुडविण्याचा घाट घातला असल्याचे दिसून येत आहे. 

 हाय-वेला समांतर असा मेट्रोचा मार्ग जात आहे. या मेट्रोच्या मार्गासाठी रॉयल चॅलेंज हॉटेलसमोर पिलर उभारण्यात आलेले आहेत. त्यातील दोन पिलर हे सदर नाल्यामध्येच उभारण्यात आलेले आहेत. हे पिलर उभारताना नाल्याचा नैसर्गिक प्रवाह सुरुवातीला फिरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये यश न आल्याने या प्रवाहाचा मार्गच छोटा करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीमध्ये असलेले पाईप काढून त्या ठिकाणी छोटे पाईप टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळे पावसाळा सुरु झालेला नसताना नाल्यातील पाणीच वाहून जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. या नाल्याची सफाईदेखील अद्याप झालेली नाही. त्यातच मेट्रोच्या पिलरमुळे वाहणार्‍या पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या