ठाण्यातील गंभीर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी

ठाणे शहरात ऑक्सिजन टंचाई, अपुरे बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई, टोसिझुमैब इंजेक्शनचा अनावश्यक वापर आदींबाबत जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपाच्या वतीने आज जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. त्याचबरोबर ठाणे महापालिकेच्या सहकार्याने भारत विकास परिषदेकडून ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल चालविण्याची तयारी असल्याचे भाजपाकडून बैठकीत सांगण्यात आले. त्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका व्यक्त केली. 

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात भाजपाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. या वेळी   जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, यांच्यासह  भाजपचे आमदार निरंजन डावखरे, खासदार विनय सहस्रबुद्धे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे,  डॉ. महेश जोशी आदींची उपस्थिती होती. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही उपस्थित राहून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या