Trending

6/recent/ticker-posts

संध्याकाळी ८ नंतर असणारा लॉकडाऊन रद्द करावा- हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनांची मागणी


 राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्य विक्रीसाठी असणारं शुल्क एकरकमी भरण्यास सांगितल्यानं हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटना आक्रमक झाल्या असून आजपासून हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. शासनानं कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. यामध्ये ठाण्यात ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या वेळी हॉटेल आणि दुकानंही बंद करावी लागत असल्यानं व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.

 त्यातच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री करण्यासाठी असणारं उत्पादन विभागाचं शुल्क एकरकमी भरण्यास सांगितल्यानं हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटना सध्या नाराज झाले आहेत. एक तर कोरोनामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला असताना दुसरीकडे ८च्या सुमारास हॉटेल बार बंद करावे लागत असल्यामुळं मोठा फटका बसत आहे. त्यामुळं उत्पादन शुल्क विभागाने हप्त्यामध्ये हे शुल्क भरण्याची परवानगी द्यावी आणि संध्याकाळी ८ नंतर असणारा लॉकडाऊन रद्द करावा अशी हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनांची मागणी आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे.

दरम्यान कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करण्राया दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच रेस्टारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करून पाचही बार मागील महिन्यात सील केले. नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत दोन ऑर्केस्ट्रा बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली.  त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या ऑर्केस्ट्रा बारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार सील केले. या कारवाईनंतर देखील चितळसर-मानपाडा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील कापूरबावडी येथील आयकॉन बार एन्ड रेस्टॉरंट, नक्षत्र बीअरबार, नौपाडा , तलावपाळी परिसरातील आम्रपाली बीअरबार, सिडको येथील मनिष बार एन्ड रेस्टॉरंट, उपवन येथील सुरसंगित बार व नटराज बार आदी अनेक बार पहाटे चार वाजेपर्यंत खुलेआम सुरु रहात असल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत आहेत.  

एकीकडे सर्वसामान्य जनतेला कोरोना फेलावतोय म्हणून रात्री 8 वाजताच निर्बंध लावणाऱया जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे या बारवाल्यांना अभय देण्यात येत असल्याने ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्याच्या  मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंधांचे सक्तीने पालन करण्याचे आदेश सर्व प्रशासनाला दिले आहेत. मात्र या निर्बंधाचे पालन फक्त सर्वसामान्य जनतेनेच करावे यासाठी महापालिका, जिल्हा, आणि पोलिस प्रशासन कार्यरत असल्याची चर्चा ठाणेकरांमध्ये होत आहे. रात्री 8 वाजल्यापासून सुरु होणारा हा बार मालकांचा धिंगाणा पहाटे चार वाटेपर्यंत सुरु असतो याबाबत प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.  Post a Comment

0 Comments