दिलीप मालवणकर यांचा समाजमाध्यमावर शब्द लाख मोलाचा

उल्हासनगर 
आज काल सोशल मिडियावर एखाद्या पत्रकाराचे निधन झाले तर लगेच श्रद्धांजली व शोक संदेशांचा पाऊस पडतो. परंतू खरोखरच गरीब व गरजू पत्रकाराच्या कुटुंबियांना  शोक संदेशाची नव्हे तर आर्थिक मदतीची तातडीने गरज असते. आधीच हलाखीची परिस्थिती आणि त्यात कोरोनाचा खर्चिक जीवघेणा आजार यात पार होरपळून निघालेल्या पत्रकाराच्या कुटुंबियांस आर्थिक मदतीची नितांत गरज असते. राजकारणी व शासकीय यंत्रणेच्या मागे लागण्यास त्या दुर्दैवी कुटुंबियांना वेळ व मनःस्थिती नसते, आणि शासकीय मदतीच्या मागे धावणे म्हणजे मृगजळामागं धावण्यासारखे निरर्थक असते. 

त्यामुळे आपला एक सहकारी पत्रकार कोरोनाचा बळी ठरला व त्याचे कुटुंब निराधार होऊन उघड्यावर पडले याने व्यथित झालेले ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी खासदार, पालकमंत्री, लोकप्रतिनिधींच्या मदतीची प्रतिक्षा न करता- "कोरडी सहानुभूती नको सढळ हस्ते मदत करूया  !" असे भावनिक आवाहन समाजमाध्यमावर केले. दिलीप मालवणकर यांनी अशा पद्धतीने यापूर्वीही अनेक गरजूंना मदत मिळवून दिली होती व त्यांचा पारदर्शक व्यवहार सर्वश्रूत असल्याने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकार सुखनंदन गवई यांच्या कुटुंबियांना मदत करण्यास लगेच सुरूवात झाली. आणि अवघ्या चोवीस तासात एक लाख अकरा हजार पाचशे अकरा रूपये इतकी रक्कम जमा झाली. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या आवाहनास अवघ्या चोवीस तासात इतका मोठा प्रतिसाद मिळण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे दहा हजारापासून पाचशे पर्यंत मदत निधी जमा होऊ लागला.प्रत्येक वेळी मालवणकर मदत देणा-यांची यादी अद्ययावत करीत होते.काही लोकांनी आपले नांव जाहिर न करण्याच्या अटीवर मदत निधी दिला. त्याची नोंद ही गुप्तदान वा गोपनीय मदत अशी केली गेली.

विशेष म्हणजे या मदत निधीत एकाही नगरसेवकाने मदत दिली नाही.  मात्र सर्व सामान्य नागरीक, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय अधिकारी,  तसेच सदानंद नाईक, गौतम वाघ, दिलीप मिश्रा, आकाश शहाणे, रामेश्वर गवई, राजू गायकवाड, जगन्नाथ जावळे, संतोष क्षेत्रे व स्वत दिलीप मालवणकर या पत्रकारांनी मदत निधीत आपापले योगदान दिले. आमदार डाॅ.बालाजी किणीकर हे आजारी असूनही त्यांनी पंचवीस हजाराची मदत जाहिर केली. अशा प्रकारे अवघ्या चोवीस तासात एक लाख अकरा हजार पाचशे अकरा रुपये इतका मदत निधी जमा झाला. आज दुपारी पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमात दिलीप मालवणकर व त्यांच्या अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या मोजक्याच सहका-यांनी दिवंगत पत्रकार सुखनंदन गवई यांच्या पत्नीस जमलेली रोख रक्कम व धनादेश सुपूर्त केला.

ज्येष्ठ पत्रकार, संवेदनशील कवी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप मालवणकर हे वेळोवेळी अशा प्रकारे गरजूंना मदत करीत असतात.गेल्यावर्षी कै.भरत खरे यांच्या स्मरणार्थ भव्य आरोग्य शिबिर आयोजित करून खरे कुटुंबीयांना सव्वा लाखांची मदत मिळवून दिली होती. आजवर त्यांनी अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रम, ज्येष्ठ वयोवृद्ध कलाकार यांना मदत निधी मिळवून दिला आहे. "दिलीप मालवणकर यांचा समाजमाध्यमावर शब्द लाख मोलाचा असतो," असेच सर्वत्र बोलले जात आहे.  अल्पावधित एका प्रामाणिक व गरजू पत्रकाराची कदर करून मदत निधी मिळवून दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA