Trending

6/recent/ticker-posts

शहापुरात सुरु होणार १६० खाटांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर


शहापूर
शहापूर तालुक्यात  को-रो-ना प्रादुर्भाव वाढल्याने कोविड केअर सेंटर आणि फिवर क्लिनिक सुरू करण्याची मागणी जनतेकडून केली जात होती तसेच खासदार कपिल पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन आरोग्य सुविधा वाढविण्याची मागणी केली होती.  त्या अनुषंगाने शहापूर येथे कोविड केअर सेंटर उभारण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले होत्या त्यानुसार अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा गोठेघर शहापूर येथे सेंटरची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली. या सेंटरच्या प्रमुख म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भिवंडी प्रांत डॉ. मोहन नळदकर, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, शहापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार निलिमा सूर्यवंशी, पंचायत समिती शहापूर गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती शहापूर, शहापूर नगर पंचायत मुख्याधिकारी वैभव गारवे, डॉ. नगरे, नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, खर्डी पोलीस पाटील श्याम परदेशी, आश्रमशाळा मुख्याध्यापक घरत आदी उपस्थितीत होते. 
पाहणी दौऱ्यात त्यांनी सर्व अधिकारी वर्गाला केंद्र शासनाने राज्याला केलेल्या निर्देशांचे  काटेकोरपणे पालन
करून को-रो-ना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूयात असे सांगत  अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा गोठेघर यांनी विनंतीला मान देत सेंटरला तात्काळ होकार दर्शविल्याने आदिवासी सेवा मंडळाचे विशेष आभार मानले व अशीच मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सध्या कर्मचाऱ्यांना आलेली मरगळ झटकून जोमाने कामाला लागा असे देखील सांगितले.

गोठेघर आश्रमशाळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये १६० खाटांची व्यवस्था असून परिस्थितीनुसार खाटांची संख्या २२० पर्यंत होऊ शकते, तसेच येथे फिवर क्लिनिक, swab सॅम्पल घेतले जातील, swab टेस्ट रिपोर्ट २४ तासात उपलब्ध होतील. तर तीव्र बाधा असणाऱ्या पेशंटला येथे न ठेवता पुढे उपचारार्थ दाखल करण्यात येईल अशी माहिती भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली व  या सेंटरच्या प्रमुख म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके या काम पाहतील त्यांच्या समवेत १० डॉक्टर काम करणार असून त्यांना शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, शहापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार निलिमा सूर्यवंशी, पंचायत समिती शहापूर गटविकास अधिकारी अशोक भवारी हे सहकार्य करतील असेही डॉ. नळदकर यांनी सांगितले. डॉ.नळदकरांनी सर्वांना जबाबदाऱ्या विभागून दिल्याने  मागच्या सारखे अधिकाऱ्यांत तू तू मै मै न होता शहापूर तालुक्याच्या नागरिकांना उत्तम सुविधा तसेच सेवा मिळणार आहेत.

 आता नागरिकांना स्वब टेस्टसाठी पडघा येथे जावा लागणार नसून गोठघर येथील कोविड केअर सेंटर लिबर्टी कंपनी पासून दूर आत आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता फारच खराब असून तो रस्ता तात्काळ करण्यात यावा. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही.-
 (पांडुरंग बरोरा, माजी आमदार , शहापूर विधानसभा क्षेत्र)

 " माझे सर्व कर्मचारी वृंद, सह वैद्यकीय अधिकारी, सर्व वरिष्ठ अधिकारी, शहापूर तालुकावासी, लोक प्रतिनिधी, पत्रकार तसेच मिळणारी सर्व मदत यांच्या सर्वांच्या सहकार्याने, मदतीने सुसज्ज कोविड सेंटर ऊभे राहणार आहे. आम्ही जास्तीत जास्त प्रामाणिकपणे चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे. कोविडवर आपण सर्वांच्या मदतीने मात करू."
(- डॉ. तरुलता धानके,  तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, शहापूर )

Post a Comment

0 Comments