देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये एकोपा नसल्यानेच लोकशाही धोक्यात


 मुंबई: 

केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारबद्दल सध्या प्रादेशिक पक्षांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे सरकार राज्यांच्या अधिकारांवर घाला घालत आहे. लोकशाहीची गळचेपी करत आहे, असे आरोप केले जात आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातही असे आरोप होत होते. आता भाजपच्या मोदी सरकार विरोधात इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निमित्तानं केंद्राच्या दमनशाहीवर टीका केली जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या दडपशाहीविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करण्याचे पत्र सर्वच प्रमुख पक्षांना पाठवलं आहे. शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून ममता बॅनर्जींच्या या आवाहनाचे स्वागत करतानाच, देशातील राजकीय वास्तवावरही प्रकाश टाकला आहे. 'देशातील अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष ‘राष्ट्रीय’ असल्याचा तुरा मिरवीत स्वतःचे स्वतंत्र राजकारण करीत आहेत. देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये एकोपा नाही. हा एकोपा नसल्यानंच लोकशाहीचं मातेरं झालं आहे. उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा?,' असा अंतर्मुख करणारा सवाल शिवसेनेने केला आहे

'आज आपापल्या राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष ‘राष्ट्रीय’ असल्याचा तुरा मिरवीत स्वतःचे स्वतंत्र राजकारण करीत आहेत. प्रत्यक्ष प. बंगालात तृणमूल काँग्रेस व सोनिया गांधींची काँग्रेस हातात हात घालून लढत नाही. ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. केरळ, तामीळनाडूत काँग्रेसही नाही आणि भाजपही नाही. तिकडे खेळ पूर्णपणे प्रादेशिक पातळीवर आहे. ओडिशाचे नवीन पटनायक कायम कुंपणावरच असतात. केजरीवाल, चौताला, बिहारात तेजस्वी यादव, कर्नाटकात देवेगौडांचे जनता दल आपापला खेळ मांडत असतात. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव जमिनीवर पाय रोवून असले तरी मायावतींचा भरवसा देता येत नाही. आंध्रातले जगनमोहन, चंद्राबाबू हे नक्की कोणत्या तळ्यात-मळ्यात आहेत ते कधीच सांगता येणार नाही. विरोधकांचा एकोपा नसल्यानेच लोकशाहीचे मातेरे झाले आहे. उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा? स्वतःचे राज्य, स्वतःचीच सत्ता हीच सार्वभौमता मानली जात असेल तर कोणत्या हुकूमशाही विरुद्ध विरोधी पक्ष लढणार आहे?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे. 'ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, एम. के. स्टालिन, नवीन पटनायक, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. पण हा एकत्र येण्याचा प्रयोग प्रत्यक्षात आकार घेईल काय?,' अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA