भारतात आज पुरुषाच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत, काल ज्यांनी सावित्रीमाईंच्या अंगावर शेण फेकले, दगड-धोंड्याने मारले, आमचा धर्म बुडाला म्हणून आरोळ्या ठोकल्या त्याच समाजाच्या स्त्रीया आज शिक्षणात अग्रेसर आहेत. आणि त्याच स्त्रीया आजही हजारोच्या संख्येने ओमकार जप करून अथर्वशीर्ष पठण करताहेत. तेही ज्या शाळेतून त्या शिकल्या त्याच शाळेकडे पाठ फिरवून. ही भारतीय समाजाची शोकांतिका आहे. हा धार्मिक पगडा मागील हजारो वर्षापासून भारतीय बहुजन वर्गावर अद्याप कायम आहे. आणि आता २१व्या शतकात तर तो अधिकच वृद्धींगत होतांना दिसत आहे. पुण्यातील मोठ मोठ्या उत्सवांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. पण सावित्रीमाईंनी शिकवलेल्या पुण्यातील पहिल्या मुलींच्या शाळेला मात्र आजही उपेक्षितच रहावे लागत आहे. याचे कारण ससंद भवन "सत्य मेव जयते" या ब्रीद वाक्याने चालते, पण मनुस्मुर्ती नुसार देश चालविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे तो असत्ये मेव जयते नुसारच चालवत आहेत. परिणामी देश धार्मिक गुलामगिरीत जात आहे. बँका, रेल्वे, सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था, सर्व ठिकाणी महिलांची आज जी काय प्रगती आहे ती सावित्रीमाईच्या त्याग, जिद्ध आणि उद्धिष्ट असलेल्या मुक्तिदातीमुळे.
भारतातील पहिली महिला शिक्षिका.महिलाची मुक्तिदाती सावित्रीमाई फुले हेच आजच्या सुरक्षित नोकरी करणाऱ्या महिला विसरल्यात. त्यांना विद्येची देवी सरस्वती, शारदा, धनाची देवी लक्ष्मी, संतोषीमाता, नवरात्रीतील दुर्गा, अंबा, कालीमाता यांची कायम आठवण राहते. त्यांची रात्र दिवस उपासणा केली जाते. पण सावित्रीमाईंचे शिक्षण आणि ऐतिहासिक कार्य शंभर शब्दात एकाही सुशिक्षित पदवीधर महिलांना सांगता येत नाही. आज महिला अवकाशात गेली तरीही त्यांच्या धार्मिक बंधनात राहण्यात काही सुधारणा नाही. सावित्रीमाई जन्माला आल्या म्हणून समस्त महिलाचा उद्धार झाला. इंग्रज (पांढरा देव ), राजाराम मोहन रॉय, शाहू फुले आंबेडकर जर या देशात नसते आले तर आज महिलांची स्थिती काय असती. मनुस्मृतीच्या संस्कृतीने या देशातील बहुजन पुरुष आणि सर्वच स्रियांना गुलाम केले. त्यांचा मेंदूच निकामी केला. सत्ता, ताकत आणि पैसा असूनही शिवाजी महाराजांना बामण घाबरत नव्हते. त्यांनी त्यांच्या समोर त्यांना शुद्र ठरवले. आज तर या वर्गाच्या हातात देशातील सर्व सत्ता संपत्ती आहे. मग बहुजनांचे काय हाल होताहेत हे सांगायची गरज नाही. सर्वप्रथम त्यांनी शिक्षण व्यवस्थाच उध्वस्त करण्याचे कपट कारस्थान सुरु केले. मात्र इथला बहुजन धार्मिक बंधनात अडकल्याने तो विरोध करीत नाही. त्यातच सर्व जातीच्या महिला आजही मनुवादी संस्कृतीच्या गुलाम आहेत.
आजही महिला जागृत नाहीत. शिकल्या पण उठाव करीत नाहीत. राजकारणात आल्या पण त्या मनुवादी संस्कृतीच्या मर्यादेतच राहतात. या गुलामगिरीने इतके अत्याचार केले असले तरी आजही गुलामगिरीच्या जोखडातून त्या बाहेर पडत नाहीत. सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, यांनी महिलांना सुधारणे साठी प्रयत्न केले. बाबासाहेब यांनी तर हिंदु कोडं बील लिहून कायदा करून हिंदु धर्मच नष्ट केला. सर्व गुलामीच्या बेड्या तोडल्या. तरी महिला स्वतःला आजही स्वतंत्र समजत नाहीत. त्यांना त्या मनुवादी संस्कृतीच्या जोखडाची सवयच नाही तर ते त्यांच्या अंगवळणीच पडले आहे. म्हणूनच आजही त्या मनुवादी संस्कृतीच्या विरोधात उघडपणे बोलत नाहीत. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, जज, ग्रॅज्युएट अशा शिक्षित झालेल्या देखील उपास-तपास करून धार्मिक बंधनात राहणेच पसंत करतात. शिक्षण वेगळे आणि धर्मसंस्कृती वेगळी असा युक्तीवाद करताना दिसतात. परिणामी त्यां मनुवादी व्यवस्थेचे पाईकत्वच स्विकारतात. देवळात देवाच्या साक्षीने बलात्काराच्या घटना घडत असताना या तथाकथित उच्चशिक्षित महिला या विरोधात किती बोलतात. मनिषा वाल्मिकीचा बलात्कार करून खून होतो तरी कोणी महिला बाहेर रस्त्यावर येऊन साधा निषेध नोंदवत नाहीत. आज आयोध्येतील राम मंदीराचा मोठा गाजावाजा देशभरात होत आहे. मात्र या मंदीरात सितेला स्थान नाही. इतकच काय तर रामाची मूर्ती देखील बालपणाची आहे. त्यामुळे त्याच्या शेजारी सिता नाही असा युक्तीवाद करण्यात आला आहे. खरंच एवढं होऊनही आजची शिक्षित स्त्री मात्र गप्प राहते याचे आश्चर्य वाटते.
मनुवादी हिंदू धर्मव्यवस्था सर्व भारतीय नागरिकांसमोर विद्येची देवता म्हणून सरस्वतीला उभी करतात. सरस्वती ही केवळ एक नदी होती. धर्माच्या ठेकेदारांनी स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तिचे देवतेत रुपांतर केले. परंतु या मनुवादी हिंदू धर्म व्यवस्थेतील प्रतिकात्मक सरस्वतीने जर कुणालाही कधीही शिकविलेच नाही तर तिचा विद्येची देवता म्हणून स्वीकार करणे विज्ञान व तंत्रज्ञान युगातही उचित ठरेल काय? यामुळे मानहानी पचवून, दगड-शेणांचा मारा सहन करून, ज्या सावित्रीबाईंनी प्रत्यक्ष मुलामुलींना शिकविले त्यांच्यावर अन्याय होत नाही काय? बहुजन समाजाने याबाबतीत जागृत होणे काळाची गरज आहे. आता ही गुलामगिरी मोडायला ना इंग्रज येणार, ना सावित्रीमाई फुले ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार. तुमची लढाई आता स्वत:लाच लढावी लागणार आहे, अथर्वशिर्षचे पठण करून आजपर्यंत कोणताही अन्याय अत्याचार थांबलेला नाही हे हजारो वर्षापासून दिसत आहे. तेव्हा आता वेळ आली आहे मनुस्मृतीच्या संस्कृतीचें ओझे फेकून देण्याची. गप्प बसने हाही एक गुन्हा आहे. जिवंत असून रोबोट सारखं आयुष्य जगण्यात काही ऐक अर्थ नाही. अन्यथा ज्याप्रमाणे वि.दा.सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने चक्क पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीमाई फुले यांचा पुतळाच हलवला. त्याचप्रमाणे कधीतरी ही मनुवादी व्यवस्था इथल्या बहुजन वर्गाला हद्दपार करेल तेव्हा व्यक्त व्हा... संघर्ष करा... हीच सावित्रीमाईंना खरी आदरांजली ठरेल.
0 टिप्पण्या