Top Post Ad

परमबीर सिंगचे पत्र अन प्रसिध्दीच्या हव्यासापायी हरपलेलं भान..!

मुंबईचे माजी पोलीस कमिशनर परमबीर सिंग यानं गृहमंत्री अनिल देशमुखवर भ्रष्टाचाराचे आरोप काय लावले महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याच्या मागणीला ऊत आला. या ना त्या निमित्तानं राज्याची सत्ता बळकावण्यासाठी पाण्यात देव ठेवलेली भाजपा, सरकार बरखास्तीची मागणी करणार यांत काही नवल नाही मात्र प्रकाश आंबेडकरांनीही हे 'चोर आणि खुन्यांचे सरकार' म्हणत झोपेतही आर.एस.एस ची टोपी घालणाऱ्या कोश्यारीची भेट घेत तीच


'री ओढणे' सर्वस्वी चुकीचंच. वर्षभरापूर्वी मनुस्मृती दहन दिनी (25 डिसेंबर 2019) 'ABP माझा' ला दिलेल्या मुलाखतीची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांनी "बाळासाहेब ठाकरे असतांना, मी अनेकदा मातोश्रीवर जावून त्यांची भेट घेतलीय..." अशी केली तर शेवट "महाविकास आघाडीचं सरकार पांच वर्ष टिकेल" असा विश्वास दाखवत केला आणि आता हे सरकार 'चोर-खुन्यांचे' अशी उपरती त्यांना झालीय. ज्यामुळे, राज्यसरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लावण्याची त्यांनी जाहीर मागणी केली आहे.

सदर मागणी ही प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या राजकीय आकलनानुसार नव्हेतर परमबीर सिंग सारख्या अत्यंत खोटारड्या माणसाच्या आरोपांना ग्राह्य मानून केलीय हे अधिक गंभीर, क्लेशदायक व आक्षेपार्ह आहे. कारण, याच बदमाश परमबीर सिंग यानं प्रकाश आंबेडकरांचा सख्खा मेहुणा डॉ. आनंद तेलतूंबडे हे कसे नक्षलवादी आहेत व ते कसे पंतप्रधान मोदीला मारण्याच्या कटात शामिल होते याची तद्दन बनावट पत्रं मिडिया समोर मांडली होती. याच लबाड परमबीर सिंगने डॉ. आनंद तेलतूंबडे वा त्यांचे कुटुंबातील कोणीही घरात नसतांना ड्युपलिकेट चाव्यांचा वापर करत त्यांचे घर फोडलं व धाड टाकली. परमबीर सिंग यांनी लावलेल्या खोट्या आरोपांना तेंव्हा डॉ आनंद तेलतूंबडे यांनी पुराव्यांसकट जाहीररीत्या खोडुन काढलंय. परमबीर सिंगच्या सदर कारवाईमुळे  डॉ आनंद तेलतूंबडे, त्यांची पत्नी रमाताई (प्रकाश आंबेडकर यांची बहीण) व दोन मुली यांची जी नाहक बदनामी झाली त्याने व्यथित डॉ आनंद तेलतूंबडे यांनी परमबीर सिंग विरोधात 'अब्रूनुकसान भरपाईचा दावा' टाकण्यासाठी शासनाकडे सप्टें 2018 मध्ये परवानगी मागितली होती जी कधीच दिली गेली नाही.  आज डॉ आनंद तेलतूंबडे तळोजा जेल मध्ये जे सडत आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे 'परमबीर सिंग' यांनी त्यांच्यावर लावलेले 'बेबुनियाद' आरोप हे होय याचं साधं भान ही प्रकाश आंबेडकरांना नसावं याला काय म्हणावं...किती हा प्रसिद्धीचा सोस..

अलुतेदार-बलुतेदार असा सारीपाट मांडत बहुजनवादी इमेज निर्माण करण्याच्या 'शूद्र' राजकारणापायी मंदिरात पाया पडणं एव्हढंच नव्हे तर प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगांवचाही  कसा वापर केलाय पहा :

१) 1818 सालच्या भीमा कोरेगांव लढाईत फक्त दलितांनी पेशवाईचा पराभव केला असं नाही तर पेशवाईच्या विरोधात मराठा व इत्तर जातीं ही इंग्रज सैन्यात होत्या असा नवा प्रचार त्यांनी एल्गार परिषदेच्या निमित्तानं सुरू केला.

२) 2018 सालच्या भीमा कोरेगांव हिंसाचारात मेंटल भिडे व दंगेखोर एकबोटेच्या नादी लागलेल्या सवर्ण तरुणांनी दलितांवर योजनाबद्धरित्या हल्ला केला हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असतांनाही प्रकाश आंबेडकर हे मानायला तैयार नाहीत...त्यांच्या मते हा हिंसाचार म्हणजे दलितांवर झालेला जातीयवादी हल्ला नसून हिंदू समाजातील एका जमावाने दुसऱ्या जमावावर केलेला हल्ला आहे ज्यात अनेक OBC जखमी झालेत.

३) भीमा कोरेगांव हिंसाचाराविरोधात काढलेल्या एल्गार मार्च (26 मार्च 2018) वेळी फडणवीसला निवेदन देतांना प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस व गिरीश बापट यांच्या जीवाला कसा धोका आहे याचे फेसबुक पुरावे दिले. नाही म्हणायला, 'जर भिडे-एकबोटेला पंधरा दिवसांत अटक नाही झाली तर विधानभवनाला घेराव घालू' अशी वल्गनाही त्यांनी यावेळी केली खरी मात्र, त्यांचा एक दिवस म्हणजे किती वर्ष हे त्यांनी सांगितलं नाही. पंधरा दिवसांची ही मुदत दोन वर्षांनंतरही संपलेली नाही.

या मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 मार्चला सभागृहात बोलतांना फडणवीस यानं सांगितलं की, 'भीमा कोरेगांव हिंसाचारात भिडेचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही..' म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या सदर 'एल्गार मार्च' ने नक्की काय साधलंय ? 

४) त्यांच्या डोळ्यादेखत भीमा कोरेगांव हिंसाचाराचे रूपांतर 'मोदीला मारण्याचा माओवादी कट' असं भाजपा ने आरामात केलं तरी प्रकाश आंबेडकरांनी तोंड उघडलं नाही.

५) एव्हढंच नव्हे तर या भीमा कोरेगांव केसमध्ये अटकेत असलेल्या रोना विल्सनच्या कम्प्युटरमध्ये पंतप्रधान मोदीला मारण्यासंबंधी जे डॉक्युमेंट्स पोलिसांनी पुरावा म्हणून सादर केलीत ती खोटी असल्याची पोलखोल अलीकडेच अमेरिकेतील आर्सेनल नावाच्या एका सायबर फॉरेन्सिक लबॉरेटरीने केलीय. याआधी गेल्यावर्षी The Caravan यांच्या सायबर टीम ने ही विल्सन व सुरेंद्र गडलिंग यांच्या कम्प्युटर मधील सदर पुरावे खोटे असल्याचा हवाला दिलाय.

अशा परिस्थितीत भीमा-कोरेगांव केस मध्ये अखंड बुडालेला आरोपी मेंटल भिडेला सोडून 'मोदी ला मारायचा कट' अशी बतावणी करत ज्या सोळा लोकांना भाजपा सरकारनं विनाकारण जेल मध्ये डांबलय त्याविरोधात मोठं जन-आंदोलन उभं करण्याची खरी गरज असतांना प्रकाश आंबेडकर चिडीचूप आहेत.आणि आतातर राज्यात भाजपा धार्जिणे सरकार आणण्यासाठी त्यांनी चक्क बदमाश परमबीर सिंग ची तळी उचलून धरलीय...काय म्हणावं याला... यांच भीमा-कोरेगांवच्या केसने विस्मृतीत चाललेल्या प्रकाश आंबेडकरांचं राजकीय पुनर्वसन केलंय हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. सरकार पाडण्यात अन राष्ट्रपती राजवट लावण्यात माहीर असलेल्या भाजपाच्या कोश्यारीला राष्ट्रपती राजवट लावण्यासंबंधित कलमांच ज्ञान प्रकाश आंबेडकरांनी देणं म्हणजे निव्वळ गंमतच त्याऐवजी UAPA चा गैरवापर करुन भाजपा त्यांच्या विरोधातील आवाजाची जी मुस्कटदाबी करत आहे त्यावर आपल्या कार्यकर्त्यांत जागरूकता आणण्यासाठी एखाद्या कलमाचा दाखला देणं गरजेचं नव्हे का..

तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ला सचिन वझेचे पत्र जाहीर करण्याची प्रकाश आंबेडकरांनी जी  'आर्जव' घातलीय त्याऐवजी 'मोदीला मारण्याचा कट' उघड करणारे पुरावे खोटे ठरल्यामुळे भीमा कोरेगांव केस मध्ये अटक असलेल्यांना NIA मुक्त का करत नाही हे डोवाल ला ठणकावून विचारणं अधिक संयुक्तिक नाही का... पण प्रकाश आंबेडकर असं संयुक्तिक का वागतील...'नातू' चे लेबल लागलंय ना...मग बिनधास्त...जो पर्यंत विचारांपेक्षा 'रक्त' श्रेष्ठ मानणारी भक्त मंडळी खोऱ्याने उपलब्ध आहेत तो पर्यंत हे असंच चालणार...भले ही मग प्रसिध्दी चा सोस आपल्या नातेवाईकाचा बळी का घेईना...

मिलिंद भवार     पँथर्स     9833830029

23 मार्च 2021(शहीद दिन)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com