महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी अलिबाग प्रेस असोसिशएनच्या माध्यमातून चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्या महिलांचा सत्कार केला जातो. मागील 12 वर्षांपासून अलिबाग प्रेस असोसिएशनने ही प्रथा सांभाळली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, अलिबाग-मुरुडच्या प्रांताधिकारी शारदा पोवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी प्रदीप नाईक, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कांबळे उपस्थित होते.
यामध्ये कोरोना कालावधीत आरोग्य सेवा देणार्या डॉ. अपूर्वा पाटील, ग्रामीण रुग्णालय मुरुड तालुक्यातील आरोग्य सेविका दक्षता चोगले (मुरुड), कोरोना कालावधीत ग्रामस्थांचा विरोध पत्करून गावोगावी प्रवाशांची वाहतूक करणार्या एसटी वाहक करुणा ठाकूर (रोहा), चक्रीवादळात म्हसळा तालुक्यात गर्भवती महिलेला रुणालयात वेळेत पोहोचवणार्या आरती राऊत (पोलीस कर्मचारी), लॉकडाऊनमध्ये सलग 71 दिवस पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवक, पत्रकार यांना नाश्त्याची व्यवस्था करणार्या पूजा नायक, वयाच्या तिसर्या वर्षात गिर्यारोहणाचा विक्रम करणारी शर्मिका म्हात्रे या सर्वांना शाळ, श्रीफळ, सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
स्त्री कधीही अबला नव्हती, निसर्गाने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती तिला दिलेली आहे. फक्त पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये परंपरा, रितीरिवाज, अंधश्रद्धांमध्ये महिलेला बंदिस्त राहावे लागलेले आहे. महिलांचे हक्क, त्यांचे अधिकार मिळवून त्यांना मान-सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करीत परंपरेच्या जोखडाखालून मुक्त होण्यासाठी महिलांनी सामूहिक प्रयत्न करताना यास कुटुंबातील पुरुषांनीही महिलांच्या प्रयत्नांना सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहिलेल्या नाहीत. ‘कलं भी भारी थी, आज भी भारी है’ असे म्हणत प्रत्येक महिलेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या पुरस्कार वितरण समारंभात केले.
0 टिप्पण्या