हा तर खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्याचा प्रकार !

 


मुंबई :   

 पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता जोरदार राजकारण पेटलं आहे.  उस्मानी याने एल्गार परिषदेत हिंदू समाजाबाबत आक्षेपार्ह भाष्य केले असल्याचा आरोप करीत,  भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिव व एबीव्हीपीचे माजी सदस्य प्रदीप गावडे यांनी शरजिल विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. 2 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे येथील स्वारगेट पोलीस ठाण्यात  आयपीसी कलम 153 (ए) (धर्म, वर्ण व ठिकाण यावरून भिन्न गटांत शत्रुत्व निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानुसार या गुह्याची चौकशी करण्याकरिता पुणे पोलिसांपुढे हजर राहण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शील उस्मानी याला मंगळवारी दिले. न्या. एस.एस.शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने पुणे पोलिसांना उस्मानीवर 16 मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. उस्मानी याने गुन्हा रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने त्यादिवशी पुढील सुनावणी ठेवली आहे.   

उस्मानी याच्यातर्फे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी समन्स बजावून बुधवारी चौकशीसाठी हजर राहायला सांगितले आहे. तो पोलीस ठाण्यात जायला तयार आहे. मात्र, त्याला अटक करण्यात येऊ नये. त्यावर न्यायालयाने उस्मानी याला बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले. तर पोलिसांना त्याच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले.   

भाषण करण्यापूर्वी किंवा नंतर घटनास्थळावर असंतोष किंवा हिंसाचार झाला नाही. समाजातील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आणि फौजदारी न्यायाव्यवस्थेचा ससेमिरा पाठी लावून खुलेपणाने व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर आळा घालण्यासाठी असे गुन्हे नोंदविण्यात येतात, असे उस्मानीने याचिकेत नमुद करीत उस्मानी याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात कोरेगाव-भीमा लढाईच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शांततापूर्ण मेळाव्यात आपण भाषण केले, असे उस्मानी यांनी याचिकेत म्हटले आहे. आपल्यावर नोंदविण्यात आलेला गुन्हा तथ्यहीन आहे. माझ्या भाषणातील काही विधाने संदर्भ न देता उचलण्यात आली आहेत. माझ्या भाषणात मी सद्यस्थितीतील समाजरचना आणि समस्या याबाबत बोललो आहे आणि या समस्येवर उपायही सांगितला आहे. केवळ लोकांना समस्यां समजावी, यासाठी काही कठोर शब्द वापरले आहेत, असे उस्मानी याने याचिकेत म्हटले आहे.  

दरम्यान मागील महिन्यात या प्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर तातडीने कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराच फडणवीसांनी दिला आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी शरजीलवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर  माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय. इतकच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपदपणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केलाय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी केला आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या