लवकरच तिसरा पूल पूर्ण होईल आणि कळव्यातील वाहतूक कोंडीला विराम मिळेल. - मंत्री जितेंद्र आव्हाड


ठाणे

 कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून या पुलावरील 100 मीटरचा गर्डर आज दुपारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बसविण्यात आला. ठाणे आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे इकडे ठाणे बेलापूर मार्ग जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल अस्तित्वात आहे. हा पूल कमकुवत झाल्यामुळे सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीस बंद करण्यास आला आहे. त्यामुळे या ठिकाणी १९९५ – ९६ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या पूलाचा सध्या वापर सुरु आहे. 

तसेच ठाणे कळवा दरम्यान वाहतूकी मध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे आणि एकच पूल सध्या वापरात येत असल्यामुळे या भागात आणि पुलावर वाहतूक कोंडी होते. आज या पुलाच्या खाडीवरील भागावर १०० मीटर गर्डर बसविण्यात आला. हा गर्डर १०० मीटर लांबीचा बास्केट हँडल आकाराचा असून त्याचे वजन ९५० मेट्रीक टन आहे. याकरिता वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारचे असलेले टेन्शन रॉड हे परदेशातुन आयात केलेले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्यामध्ये एकूण ११०० टन वजनाचा सांगाडा जमीनीपासून १४ मीटर उंचीपर्यंत उचलण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा गर्डर १०८ मीटर जमीनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारण्यात आलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा ७ दिवसांनंतर सुरु करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

यामध्ये कळवा खाडीवरील पुलाची लांबी ३०० मीटर असून त्यापैकी १०० मीटर मुख्य लांबीचा बास्केट हँडल आकाराचा गर्डर बांधण्यात येणार आहे. या पूलावर क्रिक रस्ता आणि जेल कोर्ट नाक्यावरील वाहने चढण्याकरीता सरळ मार्ग राहणार आहे. तसेच साकेत कडून येणा-या वाहनांकरीता वर्तुळाकार रॅम्प बांधण्यात येणार असून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाणेकरीता थेट मार्ग करण्यात येणार आहे. तसेच पादचाऱ्यांकरीता स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यात येणार असून पुलाचे विद्युतीकरण, कळवा पूलाकडील दोन्ही जंक्शन आणि साकेत राबोडी येथे जाणा-या रस्त्यावरील जंक्शनमध्ये सुधारणा, सुशोभिकरण आदी बाबींचा या प्रकल्पांत समावेश आहे. यामध्ये एकूण २.४० किलोमीटर पूलाचे बांधकाम होणार असून आजमितीपर्यंत ७७ % काम पूर्ण झाले आहे.

मी आमदार झाल्यानंतर तिसऱ्या कळवा पुलाचे स्वप्न मी पाहिले होते या पुलाच्या उभारणी मध्ये तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी पुढाकार घेतला. आणि दुसऱ्या राजकीय पक्षात असून देखिल मा. एकनाथ शिंदे यांनी मदत केली लवकरच हा तिसरा पूल पूर्ण होईल आणि कळव्यातील वाहतूक कोंडीला विराम मिळेल. - मंत्री जितेंद्र आव्हाड
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या