'त्या' शिवसैनिकांवर पोलिसी कारवाई

 


ठाणे : 
 सिंघानिया स्कूल, घोडबंदर रोडवरील कार्मेल स्कूल व पंचामृत सोसायटी येथे ठाणे महापालिकेकडून ३ पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. त्यातील दोन पूल मेट्रोच्या मार्गामुळे बाधीत होणार आहेत. या कामातून महापालिकेची १३ कोटी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करून ही कामे सत्ताधारी शिवसेनेकडून निवडणूक निधीसाठी केली जात असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला होता.  मात्र शिवसेनेच्या नगरसेवक-नगरसेविकांसह कार्यकर्त्यांनी झूंडीने येऊन डुंबरे यांना घेराव घातला. तसेच माफी मागण्याची मागणी केली होती.  या घेराव आंदोलनामुळे कोरोना आपत्तीच्या काळातील मनाई आदेश व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाले होते. याची माहिती मिळताच महापालिका मुख्यालयात पोचलेल्या भाजपा नगरसेवक व कार्यकर्त्यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच अडविले होते. या प्रकरणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांनी शिष्टमंडळासह नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे मागणी केली होती. त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी महापालिका आयुक्तांकडेही करण्यात आली होती. अन्यथा, भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन नौपाडा पोलिस व महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात आली.

 शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेविका राधिका फाटक, मिनल संखे, साधना जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, सिध्दार्थ ओवळेकर, शिवसैनिक राजू फाटक यांच्याबरोबरच शिवसेनेच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलिसांनी एफआयआर ७०/२०२१(प्रथम खबर अहवाल) दाखल केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (३), १३५ प्रमाणे तसेच कलम १८८ भा. द. वि. आणि साथीचे रोग अधिनियम सन १८९७ च्या कलम ३ व ४ प्रमाणे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. तोंडावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न ठेवण्याबरोबरच मनाई आदेश असतानाही पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन घोषणा देणे आदींद्वारे मनाई आदेशाचा भंग व विनापरवाना एकत्र जमल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  तर मुख्यालयात जमलेल्या गर्दीची महापालिका अधिकाऱ्यांनीही गंभीर दखल घेऊन गेटवरील सुरक्षा रक्षकांना सेवेतून तत्काळ कमी करण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांच्या कारवाईबरोबरच महापालिकेनेही कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गेटवरील सुरक्षा रक्षकांना तत्काळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मुख्यालयात १२ मार्च रोजी जमलेल्या गर्दीची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी चौकशीनंतर गर्दीला मज्जाव न करणाऱ्या गेटवरील सुरक्षा रक्षकांना तत्काळ कमी करण्याचा आदेश आज काढण्यात आला. तसेच त्यांच्यावर कर्तव्य कसूरीबाबत योग्य कारवाई केली जाणार आहे. कोरोनाच्या आपत्तीत मोठ्या संख्येने कार्यालयामध्ये नागरिक येत असताना शिस्तीचे पालन न करण्याबरोबरच गेटवरील सुरक्षा रक्षकांनी आवश्यक खबरदारी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचा ठपका महापालिकेकडून ठेवण्यात आला आहे.  भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नौपाडा पोलिसांनी नगरसेवकांसह शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यात सध्या सात जणांची नावे असली, तरी चित्रफित व पालिकेतील सीसीटीव्हीवरून आणखी शिवसैनिकांवरही गुन्ह्याची कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA