Top Post Ad

चौकाच्या नावावरून जातीचे राजकारण... स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप


 परळ- भोईवाडा येथील 'टी' आकाराच्या चौकास त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आंबेडकरी समाजातर्फे सातत्याने करण्यात येत होती. मात्र या मागणीला धुडकावून लावून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका श्रद्धा श्रीधर जाधव यांनी त्या चौकास मनोरमा दिगंबर नेरुरकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत मांडला. त्यामुळे आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मतं मागतांना यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा समाज दिसतो. मात्र निवडून आल्यावर आपला जातीवादी चेहरा नेहमीच दाखवत आले असल्याची चर्चा आता परळमध्ये रंगली आहे. याबाबत २७ फेब्रुवारी रोजी श्रद्धा जाधव यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला होता. परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांना परवानगी दिली नाही. मात्र जोपर्यंत या चौकास माता रमाई आंबेडकर नाव देण्यात येत नाही, तोपर्यंत आंबेडकरी समाज शांत बसणार नाही, असा इशारा येथील आंबेडकरी  कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

 परळ-भोईवाडा येथील मातोश्री इमारत पासून इंडियन कँसर सोसायटी समोरील परिसरात टी आकाराचा चौक तयार झालेला आहे. या चौकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी विभागातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अजित धोत्रे यांनी सन २०१८ पासून वॉर्ड क्र. २०२ च्या स्थानिक नगरसेविका श्रद्धा श्रीधर जाधव, तत्कालीन अध्यक्ष, प्रभाग समिती, एफ दक्षिण व एफ उत्तर तसेच सहाय्यक महापालिका आयुक्त, एफ दक्षिण विभाग यांना दि. २३ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या पत्रान्वये केलेली होती. सदर मागणीकडे स्थानिक नगरसेविका श्रद्धा श्रीधर जाधव यांनी दुर्लक्ष करुन त्यांच्या परिचयातील मनोरमा दिगंबर नेरुरकर यांचे नाव देण्याबाबतचा ठराव महानगरपालिकेच्या एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समितीच्या दि. २९ नोव्हेंबर, २०२० च्या सभेत मंजूर करुन घेतला. 

सदर ठरावासंबंधात नागरिकांच्या हरकती/सूचना असल्यास त्या दि. ३१ डिसेबर, २०२० पर्यंत सहाय्यक महापालिका आयुक्त, एफ दक्षिण विभाग यांच्याकडे सादर करण्याबाबतची नोटीस विभागात लावण्यात आली. श्रद्धा श्रीधर जाधव या गेल्या ३० वर्षांपासून या प्रभागाचे प्रतिनीधीत्व करतात. त्यांनी मुंबईचे महापौर पदही भूषविलेले आहे.इतक्या वर्षात या चौकाला नाव देण्याबाबत त्यांना सुचले नाही. परंतु जेव्हा त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी होत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी मनोरमा दिगंबर नेरुरकर यांचे नाव देण्याबाबतचा ठराव मांडला. त्यानंतर विभागातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र येऊन महानगरपालिकेच्या एफ दक्षिण व एफ उत्तर प्रभाग समितीच्या सभेत सादर करण्यात आलेल्या मनोरमा दिगंबर नेरुरकर यांचे नाव देण्याबाबतचा ठरावास विभागातील विविध संस्था, संघटना, पक्ष आणि लोकप्रतिनीधींकडून असंख्य हरकती सादर करण्यात आल्या. या चौकास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीस पाठींबा देण्याबाबत शेकडो स्वाक्षऱ्या करुन सहाय्यक महापालिका आयुक्त, एफ दक्षिण विभाग यांच्याकडे सादर करण्यात आल्या. . 

नगरसेविका श्रद्धा श्रीधर जाधव यांनी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या नावाला केलेल्या विरोधाचा जाहीर निषेध करण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ०१.०० या वेळात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. हे आंदोलन मोडून काढण्याकरिता स्थानिक नगरसेविकेने महापालिका आणि पोलिसी बळाचा वपर करीत आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडप तोडण्याकरिता विशेष मेहनत घेतली. पोलीस प्रशासनासमवेत चर्चा करुन सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. तरीही जोपर्यंत माता रमाईचे नाव या चौकास दिले जात नाही, तोपर्यंत आंबेडकरी जनता शांत बसणार नाही, असा इशारा इशारा स्थानिक कार्यकर्ते अजित धोत्रे  यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com