महाडचा सत्याग्रह, समतेच्या संगराचे प्रथम पाऊल

     


         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी दोन दिवस महाडला अस्पृश्य समाजाची परिषद घेऊन, दुसऱ्या दिवशी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः एक ओंजळभर आणि नंतर इतरांनी त्या पाण्याला स्पर्श करून थोडे थोडे पाणी प्राशन केले. त्यानंतर ते तळे सर्वांसाठी खुले झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. ती परिषद आणि सत्याग्रह त्यांच्या चळवळीच्या इतिहासातील समतेच्या संगराचे ते प्रथम पाऊल ठरले.            आजच्या समतेच्या संगर दिनानिमित्त आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची त्या परिषद तथा सत्याग्रहामागील भूमिका व त्यावेळेच्या उच्च जातीतिल स्पृश्य सवर्णांची मानसिकता समजून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये पाणी मिळत नव्हते असा काही प्रश्न नव्हता किंवा महाडच्या तळ्यातील पाणी अमृतासमान होते, जे प्राशन केल्याने ते अजरामर होणार होते असेही काही नव्हते. परंतु १९२७ च्या पूर्वी जवळपास दहा ते अकरा वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सभा समारंभ तथा वृत्तपत्राच्या माध्यमातून क्रांतीच्या दिशेने अस्पृश्यांच्या मनमस्तिषकाची सतत मशागत केली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव व्हायला लागली होती. स्पृश्य लोकांप्रमाणे आपणही नैसर्गिक हक्क अधिकारांचे अधिकारी आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे सवर्णांच्या मानसिकतेची चाचपणी करणे आवश्यक होते. ते अस्पृश्यांना मानव समजतात किंवा नाही? त्यांचे नैसर्गिक हक्क अधिकार त्यांना मान्य आहेत किंवा नाही? समतेचे बीजारोपण त्यांच्या रक्तमांसी झाले किंवा नाही? हे समजून घेण्यासाठी समतेच्या संगराचे ते प्रथम पाऊल होते.

             ४ ऑगस्ट १९२३ रोजी रावबहादूर सी. के. बोले यांनी मुंबई प्रांतिक विधिमंडळामध्ये एक ठराव पास करून घेतला होता. त्या ठरावान्वये सार्वजनिक शाळा,पाणवठे, धर्मशाळा, न्यायालये ही अस्पृश्यांना खुली झाली होती. परंतु त्या ठरावा मध्ये एक त्रुटी होती, ती म्हणजे स्थानिक प्राधिकरण, नगरपालिका, नगरपंचायत, नगर मंडळे यांनी त्यांच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळे खुली करण्यासाठी स्वतंत्र ठराव पास करावे

             अस्पृश्य समाजातील बरेच लोक भागवतधर्मी (वारकरी) असल्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह करून क्रांतीचा झेंडा प्रथम तेथे उभारावा असा विचार काही काळ समोर आला होता. परंतु कायदेशीर बाबी तपासल्या असता तेथील अनेक गोष्टी बोले ठरावाला अनुकूल नसल्याचे लक्षात आले. तेव्हा महाड नगरपरिषदेने सुरभानाना टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेऊन तेथील तळे सार्वजनिक करून अस्पृश्यांसाठी खुले केले होते. परंतु एवढी पाण्याची चणचण असूनही त्या तळ्यावर अस्पृश्यांनी पाणी भरण्याचा शिरस्ता पडला नव्हता. यासोबतच आणखीही काही ऐतिहासिक कारणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीविरुद्ध बंड उभारण्यासाठी महाडची निवड केली होती.

           महाडचा समता संगर हा १९ व २० मार्च असा दोन दिवस कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या नेतृत्वात पार पडला. पहिल्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त उपस्थित असलेल्या लोकांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक भाषण झाले. जे आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विविध विषयाला हात घालत म्हटले की, 'आपल्या आजच्या दु:स्थितीला इतरांप्रमाणे इंग्रजीही जबाबदार आहेत. आमच्यामुळेच म्हणजे त्यांनी एत्तदेशियांचे सैन्य उभारले म्हणून त्यांना सत्ता स्थापन करता आली. परंतु नंतर त्यांनी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.' यावरून हेच लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकारची कधीच भीड बाळगली नाही. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, ' परंपरागत कामे त्यांनी सोडून दिली पाहिजे. आपल्या उपजीविकेसाठी नोकरी करावी अथवा शेती करावी. कोणाच्याही शिळ्या अथवा उष्ट्या तुकड्यावर जगू नये. प्रत्येकांनी मुला मुलीच्या शिक्षणाची काळजी घ्यावी. कुणाचीही गुलामी करू नये, त्यासाठी जागृतीचा अग्नी सतत प्रज्वलित ठेवावा, यासाठी पेन्शनर लोकांनी चळवळीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर परिषदेमध्ये ३३ ठराव पास करण्यात आलेले सर्व ठराव अस्पृश्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी होते. तसेच ते इंग्रज सरकार आणि स्पृश्य लोकांसाठी सूचक होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी काही ठरावांवर चर्चा व भाषणे झाली. त्यानंतर अनंत विनायक चित्रे यांच्या सूचनेप्रमाणे सर्वजण शिस्तीत तळ्यावर जाऊन तेथील पाणी सर्वांनी प्राशन केले. त्यानंतर सर्वजण आपल्या मूळ ठिकाणी परतले. काही लोक जेवण करत होते, काही आपापल्या गावाकडे परत निघाले होते तर काही महाड गावामध्ये फेरफटका मारत असताना काही समाजघातकी स्पृश्यलोकांनी गावामध्ये गुरुवामार्फत खोटी दवंडी पिटवून सांगितले की, अस्पृश्य लोक आता विरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिर सुद्धा बाटवणार आहेत. त्यामुळे गावातील जातग्रस्त उच्च जातीचे लोक खवळले. त्यांनी अस्पृश्यांवर अचानक हल्ला चढवला. त्यांच्याकरवी पिण्याचे पाणी रिचवून जेवणात माती कालवण्यात आली. अनेकांना बेदम चोप देण्यात आला. वीस लोक मरणासन्न अवस्थेला पोहोचले. साठ-सत्तर लोकांना जबर जखमी केले गेले. त्यामध्ये तीन चार बायका एका बालकाचा सुद्धा समावेश होता. एवढे होऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना धीर देऊन संयम बाळगण्यास सांगितले.

        दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २१ मार्च १९२७ रोजी महाडातील उच्चजातीय कर्मठ स्पृश्य लोकांनी अफलातून प्रयोग केला. त्यांनी तळ्यातील १०८ घागरी पाणी बाहेर काढून त्यामध्ये वेदमंत्रोच्चाराच्या सहाय्याने पंचगव्य(गायीचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप) मिसळूले. तेच पाणी पुन्हा तळ्यात टाकून त्याचे शुद्धीकरण झाल्याचे जाहीर केले.              अशा कोत्या आणि मनुवादी, विषमतावादी, सडक्या मानसिकतेचे लोक आजही समाजामध्ये पाहायला मिळतात. आजही खेडोपाडी कामगार, मजूर महिला-पुरुषांच्या कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वेगवेगळी व्यवस्था असते. काहींच्या मानसिकतेला जडलेला अस्पृश्यतेचा उच्चनीचतेचा जातीयवादी रोग अजूनही बरा होण्याचे नाव घेत नाही. ते माणसाला माणूस समजायला तयार नाहीत. त्यांच्या लेखी माणसापेक्षा जनावरांची किंमत तथा महत्त्व जास्त आहे. म्हणूनच तर मागील आठवड्यात उत्तर प्रदेशामध्ये एका दहा बारा वर्षाच्या मुस्लिम मुलाला मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला म्हणून जबर मारहाण केली गेली. अशा लोकांना फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेच जाहीरनामा वाचणे आवश्यक आहे. ज्यामुळे त्या देशातील लोक क्रांतीसाठी तयार होऊन स्वतंत्र झाले. ते म्हणतात,' सर्व माणसे जन्मता समान दर्जाची असतात व ती मरेपर्यंत समान दर्जाची असतात.'


भिमराव परघरमोल              मो.९६०४०५६१०४
व्याख्याता तथा अभ्यासक  फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला 

---------------


महाड चवदार तळे सत्याग्रह, मानव मुक्तीचा संग्राम. 

" सद्गृहस्थहो, चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला काही भाग नाही. आज पावोतो चवदार तळ्याचे पाणी प्यालो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे... हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे!" असे उदगार,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, दि. २५ डिसेंबर १९२७ च्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या दुसऱ्या परिषदेत काढले होते. 

भारतातील समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाराष्ट्रातील महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. दि. २० मार्च १९२७ रोजी मुंबई, ठाणे, रायगड (तत्कालीन कुलाबा) रत्नागिरी, पुणे या प्रमुख जिल्ह्यातील हजारो अस्पृश्य जनतेने व काही स्पृश्य समाजातील सुधारक व्यक्तीनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जाहिरपणे चवदार तळ्याचे पाणी प्यायले व हिंदू धर्म, रुढी, परंपरांना खुले आव्हान दिले. बाबासाहेबानी त्यासाठीच या लढ्याला " धर्म संगर " या शब्दाने संबोधले. 

‌           या तथाकथित " हिंदूस्थानात " हजारो वर्षे हिंदू धर्मातील रुढी- परंपरा, जातिव्यवस्थेने अस्पृश्यांना, स्त्रियांना, बहुजनवर्गियांना साधे माणुसकीचे जीणंही  नाकारले होते. येथील अस्पृश्य समाजावर तर गुलामगिरीचे, लाचारीचे जीवन लादले होते.गुरढोर, पशुपक्षी, कुत्री मांजरं,तसेच अन्य मुस्लिम, ख्रिस्ती धर्मिय माणसेही ज्या तळ्याचे, विहिरीचे पाणी बिनदिक्कत पिऊ शकत होते, तेच पाणी पिण्यास हिंदू धर्मातील अमानुष-जातीव्यवस्थेने त्याच धर्मातील दलितांना,अस्पृश्य माणसांना मात्र मज्जाव केला होता. अस्पृश्यांच्या सावलीचाही तथाकथित उच्च वर्णियांना विटाळ होता. सवर्ण समाजातील माणसांना असलेले सर्व हक्क अस्पृश्यांना नाकारले होते व सामाजिक विषमतेचे चटके खातच आयुष्यभर बहिष्कृताचे जीणं जगाव लागे. अशा या पाश्र्वभूमीवर  झालेल्या महाड चवदार तळ्याचा मानवतेचा मुक्ती संग्राम खूप महत्त्वाचा  आहे. आधुनिक काळातील भारतातील दलित, अस्पृश्यांच्या मुक्ती लढयाची सुरवातच महाडच्या ऐतिहासिक सत्याग्रहाने झाली आहे. 

या सत्याग्रहाचे प्रमुख संघटक होते आर. बी. मोरे आणि त्यांना साथ मिळाली " महार समाज सेवा संघा"चे सल्लागार व वयोवृद्ध नेते संभाजी तुकाराम गायकवाड, शिवराम गोपाळ जाधव, विश्राम सवादकर, भिकाजी गायकवाड, गोविंदराव आड्रेकर, चांगदेव मोहिते, सिताराम शिवतरकर, तानाजी गुडेकर,पांडुरंग महादेव साळवी, राघोराम गोयलकर, मारुती आगवणे, बाबू मोरे, राया मोरे, वरघरकर हे अस्पृश्य समाजातील कार्यकर्ते व भाई अनंत चित्रे, सुरबानाना टिपणीस, कमलाकांत चित्रे, बापूसाहेब सहस्रबुद्धे आदी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या स्पृश्य समाजातील सहकार्यांची.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad