जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत सहकार पॅनलन बाजी मारली असून २१ पैकी १८ जागा जिंकल्या. मतदारांनी महाविकास परिवर्तन आघाडीचा दारुण पराभव केला आहे. या निवडणूकीत बहुजन विकास ९.भाजपा ७ आणि अन्य २ असे सहकार पॅनल चे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यानी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून सुद्धा बँकेच्या मतदारांनी त्यांना नाकारले असे केळकर यांनी सांगून सहकार पॅनलचे गेल्या टर्म मधील कार्याला मिळालेली ही पोचपावती असून सहकार पॅनल मध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारुपाला नेण्याचे काम हे संचालक करतील असा विश्वास संजय केळकर यांनी बोलताना व्यक्त केला.
जिल्ह्यातील ग्रामीण अर्थ आणि राजकारणावर प्रभाव असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवती बँकच्या संचालक मंडळासाठी या निवडणुकीत सहा उमेदवार या पूर्वीच बिनविरोध निवडून आल्यामुळे 15 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 46 उमेदवार रिंगणात होते. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका बुथवर केवळ 300 मतदारांनाच परवानगी देण्यात आली. निवडणूक प्रक्रीया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 110 कर्मचारी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
बँकेत बविआ प्रणित सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. त्यासमोर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलचे आव्हान होते. सहकार पॅनलला शिट्टी तर परिवर्तन पॅनलला कपबशी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. बाविआने भाजपला या निवडणुकीत गुंडाळले असल्याची चर्चा होती. तर महाविकास आघाडीने काँग्रेसला कमी जागा दिल्याने थोडा नाराजीचा सूर होता. त्यामुळे या मतभेदाचा परिणाम मतदानावर झाला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडून आलेल्या सहा उमेदवारांपैकी पाच जण आपल्या पॅनलचे असल्याचे बविआने जाहिर केले होते
महाविकास आघाडीने ठाणे पालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार, जगन्नाथ चौधरी, पंडीत पाटील, निलेश सांबरे, विशाखा खताळ, अनिल शिंदे, शोभा म्हात्रे आदी उमेदवारांना संधी दिली. तर सहकार पॅनलने प्रशांत पाटील, अरुण पाटील, उल्हास बांगर, वासुदेव पाटील, इंद्रजित पडवळ, लक्ष्मण डोंबरे, शिवाजीराव शिंदे, निता कांबळी, राजेश पाटील यांना उमेदवारी दिली होती.
१० हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अखेर विद्यमान संचालकांच्या सहकार पॅनलचाच झेंडा फडकला. बँकेवर हितेंद्र ठाकूर यांचेच एकहाती वर्चस्व आहे , हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. २१ पैकी तब्बल १८ जागा जिंकून त्यांनी शिवसेना- काँग्रेस - राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना जोरदार झटका दिला. तिन्ही पक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली. निलेश सांबरे यांनी सहकार पॅनलसमोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र त्यांचा ३६१ मतांनी पराभव झाला आहे. त्यांच्यावर ३०७ कलम लागलेले असल्याने व त्यांना मतदानाच्या दिवसापर्यंत जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था विरोधकांनी केल्याने त्यांना उघड प्रचार करता आला नाही. ते उघडपणे प्रचारात असते तर मात्र सहकार पॅनलला जिंकण्यासाठी तोंडाला फेस आणला असता. परंतु सहकार पॅनलने सांबरेंनी उभे केलेल्या एकाही उमेदवाराला जिल्हा मध्यवर्ती बँकेमधे शिरकाव न करू देताच यश मिळवले आहे.
0 टिप्पण्या