Top Post Ad

आम्ही रिकामी थाळी वाजवायला सांगितली नाही तर.... - मुख्यमंत्री

मुंबई: 

गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते पण आमची कामे मात्र यांना खुपतात. आम्ही रिकामी थाळी वाजवायला सांगितली नाही तर शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्ये दिली जी अजून सुरु आहे. त्यामुळे भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारने केलेल्या विविध कामांचा आणि पुढील संकल्पांचा उल्लेख अधिवेशनात केला. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणावर अविश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी विरोधकांना फटकारले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात नसल्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. खोटे बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण असते, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे केंद्रातील भाजपला लगावला.

'राज्यपाल महोदयांचे भाषण आपण सर्वांनी ऐकलं. राज्यपालांना मी धन्यवाद देतो. त्यांनी नि:पक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली. त्यातही ते मराठीत बोलले याचा जास्त अभिमान वाटतो. त्यांनी मांडलेल्या मुद्दांवर अनेकांनी आक्षेप घेतला. राज्यपालांनी भाषण मान्य केले पण त्यांच्याच सदस्यांना ते मान्य नाही. राज्यपाल ही आपण संस्था मानता आणि त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन होता. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले गेले आहे. मराठी भाषा भिकारी आहे का, ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते. छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी एकत्र येण्याचे आश्वासन दिले आहे. चला मग दिल्लीत जाऊया कर्नाटक सरकारने कशी बेळगावमध्ये सीमा भागातील मराठी माणसावर अन्याय केला, त्याची तक्रार करूया. केंद्राकडे जाऊन कानडीच्या सक्तीबद्दल सांगू, असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलं.

 शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्याप्रमाणात राबवणार. गुंतवणुकीत गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे दिसतो, तिथे गुंतवणूक होऊ द्या पण ती किती फसवी ते सांगतो. नीती आयोगाच्या बैठकीत धोरण ठरवण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले होते. राज्यातली स्पर्धा खड्डयात घालणारी. गुजरातमध्ये आभासी गुंतवणूक. कंपनीचे शेअर घेतले ते उपभोक्ता कंपनीसाठी नाही. गुजरातमध्ये जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात १ लाख १६ हजार ५११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात काही विदेशी कंपन्यांनी या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत. ही गुंतवणूक कंपनीमध्ये झाली आहे. उत्पादक उद्योगात नाही. हे येथे स्पष्ट करणे गरजेचे आहे. आमची गुंतवणूक प्रत्यक्ष आहे. चुकत असू तर नक्की वाभाडे काढा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका तुमच्याकडून राज्यात गुंतवणूक येत असेल तर तीही करायला हरकत नाही. 

शिवभोजन पाठ थोपटवून घेणारी नसली तरी पोट भरणारी योजना. आमच्या योजनांचे वाभाडे काढले, गॅसच्या किंमती वाढल्या, उज्वला गॅस योजनेचे काय झाले? खोटे बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण असते. कांजूरमार्ग जागा केंद्र आपली आहे असं म्हणत आहे. मेट्रो प्रकल्प दोन्ही सरकारचा आहे तर मग ही खेचाखेची कशाला असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 

अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेतून उत्तर दिले.  उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली तेव्हा बंद खोलीत त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही आश्वासन दिले नाही, असे विधान अमित शहा यांनी केले होते. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी शहा आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारचा तीन चाकी रिक्षा असा उल्लेख केला होता. शहा यांची ही टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किती जिव्हारी लागली, हे आज पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी अगदी शिवसेना स्टाइल भाजप आणि अमित शहा यांचा समाचार घेतला.

भाजपला हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांनी चांगलंच फटकारलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण तुम्ही ठेवलीत त्यासाठी मी आभारच मानेन पण तुम्हाला आताच बाळासाहेबांचे उमाळे का येत आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. बाळासाहेबांच्या खोलीत जेव्हा अमित शहा आणि माझी चर्चा झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो. या बंद दाराआड झालेली चर्चा तुम्ही निर्लज्जपणे बाहेर येऊन नाकारताच कसे? मी मुद्दाम याला निर्लज्जपणा म्हणेन. असंसदीय शब्द असला तरी मी तो बोलेन. बंद खोलीत चर्चा झाल्यावर बाहेर येऊन खोटं बोलायचं हेच तुमचे हिंदुत्व आहे का? हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे का?, अशा घणाघाती शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. २०१४ ला युती तुम्ही तोडली तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही राहू, असे खडेबोलही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढता. त्यांना विसरला नाहीत. त्यासाठी धन्यवाद पण त्यांचे हिंदुत्व तुम्ही विसरू नका हे माझे सांगणे आहे. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. तेव्हा बाबरी आम्ही पाडली नाही म्हणून तुम्ही हात वर केले होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. राम मंदिर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होत आहे आणि आता राम मंदिरासाठी हे घरोघर पैसे मागत फिरत आहेत. असे असले तरी ते आमच्यामुळे होते आहे, असे त्यांना दाखवायचे आहे, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर साधला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com