आकारी पडीत सरकारी जमिनीवर केले अतिक्रमण; शहापूर तहसीलदारांकडून कारवाईला दिरंगाई ?


शहापूर 

 जिल्हा परिषद आसनगाव गटातील मौजे खातिवली ग्रामपंचयत हद्दीतील  आकारी पडीत सरकारी जमिनीवर विना परवानगी अनधिकृत बांधकाम केल्याने येथील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पेट्रोल पंप, कंपणी तसेच हॉटेलसह अनेकांना अनधिकृत बांधकाम काढण्याच्या दुबार नोटीसा शहापूर  तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी दिल्या मात्र मुदत संपून एक महिना उलटूनही कारवाई न झाल्याने येथील संतप्त ग्रामस्थांकडून तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांचे कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव जिल्हा परिषद गटातील मौजे खातिवली येथील सर्व्हे नंबर २२३ आणि सर्व्हे नंबर २२७ या आकारी पडीत शासकीय जमिनीवर विना परवानगी अनधिकृत बांधकामे केल्याच्या तक्रारी तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांना प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने सूर्यवंशी यांनी २२ जानेवारी २०२१ रोजी अधिक्षक भूमिअभिलेख शहापूर भूकर मापकासह तसेच मंडळ अधिकारी वासिंद व तलाठी सजा वासिंद यांचे समवेत मौजे खातिवली येथील शासकीय जागेची स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत रित्या शासकीय जागेवर बांधकाम केल्याचे दिसून आल्याने तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० (२) चे तरतुदीनुसार शासकीय जमिनीत केलेले अतिक्रमण सात दिवसांचे आत स्वतःहून काढून टाकावे व अतिक्रमण केलेली जागा खुली करावी अन्यथा कोणत्याही प्रकारची नोटीस न देता सरकारी खर्चाने कोणत्याही दिवशी अतिक्रमण काढून टाकण्यात येईल. यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम तसेच वरील जमिनीचा बिनशेती आकार व दंडाची रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून आपल्याकडून वसूल करण्यात येईल अशी प्रथम नोटीस २२ जानेवारी २०२१ ला सर्व्हे नंबर २२३ या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले खातिवली ग्रामपंचायत सरपंच अशा रमेश हंबीर यांचे पती रमेश धोंडू हंबीर, खातिवली ग्रामपंचायत सदस्य कविता बाळाराम हंबीर यांचे पती बाळाराम धोंडू हंबीर, कृष्णा पेट्रोल पंपचे मालक महेंद्र मिस्त्रा राजेंद्र बहादूर यादव, हॉटेल कैलास परबत, हिना मेटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पांडुरंग धोंडू हंबीर , विमल अशोक शिंदे, कुमार दरारा तसेच प्रिती प्रमोद महाजन यांना देण्यात आली होती.

परंतु अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्या या सर्व लोकांनी तहसीलदारांच्या या नोटीसीला गांभिर्याने न घेता केलेले अतिक्रमण काढले नाही किंवा तहसील कार्यालयास खुलासा सादर न केल्याने  निलिमा सूर्यवंशी यांनी पुनः ५ फेब्रुवारी २०२१ ला दुसरी नोटीस काढली व त्यात स्पष्ट उल्लेख केला की केलेले अतिक्रमण दोन दिवसांचे आत स्वताहून काढून टाकावे व अतिक्रमण केलेली जागा खुली करावी अन्यथा कोणत्याही प्रकारची नोटीस न देता सरकारी खर्चाने कोणत्याही दिवशी अतिक्रमणे काढून टाकण्यात येईल. यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम तसेच वरील जमिनीचा बिनशेती आकार व दंडाची रक्कम जमीन महसूलाची थकबाकी म्हणून आपल्याकडून वसूल करण्यात येईल. मात्र दुसरी नोटीस देऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील अतिक्रमित बांधकाम काढले गेले नाही. आणि तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी देखील शासकीय जागेवरील अतिक्रमण दिलेल्या नोटीसाप्रमाणे निष्काशीत केले नाही त्यामुळे 
येथील संतप्त ग्रामस्थांकडून तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांचे कार्यवाहिवर संशय व्यक्त केला जात आहे. 
याबाबत तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांचे कडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाळा टाळ केली.


(सरपंच आशा रमेश हंबीर तसेच सदस्या कविता बाळाराम हंबीर यांनी केलेल्या अतिक्रमानाबाबत, 
खातिवली ग्रामपंचायत सदस्य देविदास सदाशिव जाधव व माजी सदस्या सपना वासुदेव हंबीर यांनी ७ जानेवारी २०१९ रोजी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे कडे केलेल्या ३९(१) या तक्रारी अर्जाची चौकशी न्यायप्रविष्ठ आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने सदस्य अपात्रतेबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्याने किंवा   कुटुंबातील कोणीही सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले असेलतर संबंधित सदस्य अपात्र ठरतो. त्यानुसार खातिवली ग्रामपंचायत सरपंच व सदस्याचे पद धोक्यात आले आहे)


 "या सर्व महसूल शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण काढून टाकून सार्वजनिक लोकहिताचे उपक्रम राबविता येतील. हे अतिक्रमण काढले नाहीतर शासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कोर्टात केस करून दाद मागू." - 
 देविदास सदाशिव जाधव,        (माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रा.प.सदस्य, खातिवली )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या