महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविणार ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक


 30 मार्च रोजी ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे.  ही  निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.  या निवडणुकीची जबाबदारी आर.सी. पाटील आणि गोपाळ लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. या आधी ही निवडणूक कधी गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र, आता महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढविणार आहे.  

ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी येत्या 30 मार्च रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी 26 ते 4 मार्च दरम्यान अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 5 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 21 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तर, 30 मार्च रोजी मतदान आणि 31 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14, पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

उमेदवार निवडीपासून महाविकास आघाडी एकत्रित काम करणार असून ही निवडणूक आम्हाला अवघड नाही असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. टीडीसीची निवडणूक लढवून आपल्या विचारांची एक संस्था ताब्यात घेऊन त्याद्वारे रोजगार निर्मिती करण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. जर कार्यकर्त्यांनी एकत्र यायचे ठरविले तर त्यासाठी मेहनत करायला आम्ही तिन्ही पक्षांचे नेते सज्ज आहोत. 

सध्या ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे ही निवडणूक सूप सोपी आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी, “ही सहकाराची निवडणूक आहे.सहकार अडचणीत आल्यावर सरकारने मदत करायची असते. गेले अनेक वर्षे आम्ही हेच करीत आलेलो आहोत. म्हणून सहकार क्षेत्र जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.” जागा वाटपाबद्दल विचारले असता, ही पहिलीच आढावा बैठक आहे. लवकरच जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या