मिरा भाईंदरचा खाडी किनारा होणार विकसित

वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट साठी  आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुख्यमंत्र्यांचाही सकारात्मक प्रतिसाद !!
राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद होण्याचा विश्वास.

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर ते जेसल पार्क खाडी किनारा विकसित करण्यासाठी या आर्थिक वर्षात १५० कोटी रूपयांची तरतूद करण्याची विनंती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन केली.  सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.  मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  या मागणीसंदर्भात येत्या काही दिवसात सर्व संबंधित विभाग व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव आबासाहेब जऱ्हाड यांना दिल्या आहेत. मीरा भाईंदरसह ठाणे , पालघर, कल्याण डोंबिवलीच्या किनारपट्टी विकासाला यामुळे भविष्यात चालना मिळणार असून राज्याच्या यंदाच्या बजेटमध्ये खाडी किनारा विकास , जलवाहतूक यासाठी आर्थिक तरतूद होण्याचा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. 

 'ओवळा-माजिवडा मतदारसंघामध्ये मिरा-भाइर्दर महानगरपालिका क्षेत्रामध्ये घोडबंदर पासून जेसल पार्क चौपाटी पर्यंत खाडी किनारा लाभलेला असून या ठिकाणी असलेल्या घोडबंदर किल्याचे संवर्धन , नूतनीकरण असे काम पुरातत्व खात्याच्या परवानगीने चालू आहे. त्या शेजारील महसुल खात्याच्या जमिनीवर पर्यटन विभागाकडून 'शिवसृष्टी' उभारणेबाबत कार्यवाही चालू आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराची वाटचाल चालू असताना ऐतिहासिक महत्व असलेल्या हा खाडी किनारा विकसित केल्यास मुंबईच्या वेशीवर असलेल्या या शहराला पर्यटनाच्या दृष्टीने महत्व प्रप्त होईल. माझ्याच मतदारसंघातील ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने गायमुख चौपाटी विकसित केली असून नागला बंदर, कोलशेत, बाळकुम व कोपरी येथील खाडी किनारा विकसित करण्याचे काम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालू आहे. 

ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून स्मार्ट सिटीतून मिळणा-या निधीतून हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मिरा-भाइर्दर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच असल्याकारणाने एवढा खर्च महानगरपालिकेच्या माध्यमातून होवू शकत नसल्याने मीरा भाईंदरचा खाडी किनारा विकास यासाठी राज्य शासनाने या प्रकल्पासाठी १५० कोटींचे अनुदान या आर्थिक वर्षात मिरा-भाइर्दर महानगरपालिकेला द्यावे जेणेकरून या प्रकल्पाला गती मिळू शकेल असे सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये जलवाहतूक  सुरु होणार आहे. हे वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचे काम खाडी किनारा विकसित केल्यास त्याचा फायदा जलवाहतुकीला सुध्दा भविष्यामध्ये होवू शकतो असे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आमदार सरनाईक यांच्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. मीरा भाईंदर शहरावरही आपले लक्ष असून मीरा भाईंदरसह ठाणे जिल्हा, कल्याण डोंबिवली , वसई येथील खाडी किनारा विकास , जलवाहतूक यासाठीही सरकार प्राधान्य देईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. खाडी किनारा विकासासाठी राज्याच्या बजेटमध्ये तरतूद होईल असा विश्वास असून भविष्यात मीरा भाईंदर - ठाणे - वसई - मुंबई अशी जलवाहतूक वाढेल. तसेच खाडी किनारा विकसित केल्यास पर्यटकांच्या दृष्टीने व शहरातील नागरिकांनाही या विकसित झालेल्या खाडी किनाऱ्यावर हक्काने चार निवांत क्षण घालवता येतील. त्यामुळे किनाऱ्याचा विकास व जलवाहतूक यासाठी आपला सरकारकडे पाठपुरावा सुरु राहील , असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पालिकेकडून आराखडा होणार तयार !!
मीरा-भाईंदर शहर तीन बाजूंनी खाडीने वेढले गेले आहे. त्यामुळे मीरा भाईंदरचा खाडी किनारा विकसित व्हावा अशी आमदार सरनाईक यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीनंतर याबाबत मीरा भाईंदर महापालिकाही खाडी किनारा विकासाबाबत एक सादरीकरण (प्रेझेन्टेशन) तयार करणार असल्याचे कळते. 
 'वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट'साठी सरनाईक आग्रही राहिले आहेत. रस्ते वाहतुकीवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. त्यामुळे जलवाहतूक व खाडी किनारा विकास व्हायलाच हवा. सरनाईक यांच्या मागणीनंतर मीरा भाईंदर पालिका आयुक्तांनीही या मागणीवर कार्यवाही सुरु केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पालिकेचे कन्सल्टन्ट नितीन कुलकर्णी यांना खाडी किनारा व  'वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट'चा आरखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. मीरा भाईंदरचा खाडी किनारा कशापद्धतीने विकसित होऊ शकतो , त्यात कोणते प्रकल्प होतील याबाबतचा अभ्यास करून हा आराखडा बनेल, अशी माहिती सरनाईक यांच्याकडून देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या