ठाणे शहराला सुमारे 32 किमीचा खाडी किनारा लाभला आहे. सध्या सुरु असलेल्या मेट्रोच्या कामातील मातीचे मोठ मोठे डंपर खाडी किनारी रिकामे केले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कांदळवनांची प्रचंड प्रमाणात हानी होत आहे. खाडी किनारी भराव टाकून त्याचा वापर करण्यात येत आहे. याबाबत सातत्याने वर्तमानपत्रातून बातम्या येत असतात. मात्र ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाने प्रचंड भराव टाकून स्टेशन लगतच्या चेदणी कोळीवाडा सिडको परिसरातील खाडी किनाऱयाला नाल्याचे स्वरुप दिले असल्याची बाब मात्र धक्कादायक आहे. हा खाडीकिनारा ठाणे महानगर पालिकेने जोशि बेडेकर महाविद्यालाला आंदण दिला असल्याची बाब येथील नागरिक नेहमीच बोलत असतात. महाविद्यालयाचा पसरा केवळ समोरूनच नाही तर मागील बाजूने देखील प्रचंड वाढत आहे. मागील बाजूने खाडीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पुढील बाजूने सिडको बस स्टॉप येथून सुरु झालेला महाविद्यालयाचा पसारा अगदी चेंदणी कोळीवाडा ते महागिरी कोळीवाडा पर्यंत वाढतच चालला आहे. याबाबत ठाणे महानगर पालिका प्रशासनाने चौकशी करून या महाविद्यालयाला देण्यात आलेला भूखंड आणि आज वापरत असलेला भूखंड याची तात्काळ चौकशी करण्याची गरज येथील अनेक नागरिकांनी व्यक्त करतात.
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात भूमाफियांनी प्रचंड साम्राज्य निर्माण केले आहे. अनेक ठिकाणच्या खाडी किनारी बेकायदेशीरपणे रॅबीटचा भराव करण्यात आला आहे. तसेच कांदळवनाचीही कत्तल मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे. तसेच यामुळे परिसरातील मलवाहिन्या आणि गटारांचे पाणी सर्रास खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे आधीच दूषित असलेले खाडीचे पाणी आणखीन दूषित होऊ लागले आहे. म्हणूनच पावसाळ्यात या ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. ठाण्यातील या बड्या प्रस्थ असलेल्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या एकूणच जागेविषयी आणि इमारतींविषयी ठाणे महानगर पालिकाच नव्हे तर एकूणच जिल्हा प्रशासन मुग गिळून गप्प असल्याची चर्चा नेहमीच ठाण्यात होत असते.
0 टिप्पण्या