Top Post Ad

वेडात मराठे वीर दौडले सात...

 इतिहासात पावनखिंडीला जे महत्त्व आहे तेच नेसरीच्या खिंडीलाही आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा मावळ्यांच्या शौर्याने आणि बलिदानाने उजळून निघालेला तो दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी १६७४. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या इतिहासाच्या शौर्य गाजवविणाऱ्या आठवणींना आज उजाळा देऊ या.. 

 म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात..
कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या या ओळी लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना आपणांस स्फुरण चढल्याशिवाय राहात नाही. अंगावर शहारे आणणारा इतिहास कविवर्य कुसुमाग्रजांनी स्फूर्तीगीतातून जिकंत केला. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर खरोखरच सात साहसी वीरांनी शत्रूकडे दौड घेऊन स्वराज्यासाठी बलिदान दिले. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता २४ फेब्रुवारी १६७४.

भोसरे (ता. खटाव, जि. सातारा) या गावी जन्म घेतलेले स्वराज्याचे दुसरे सेनापती कुडतोजी गुजर. महाराजांच्या शब्दाखातर स्वराज्यात दाखल झाल्यानंतर राजांनी त्यांना किताब दिला प्रतापराव! राजे जेव्हा आग्र्यात अटकेत होते तेव्हा याच प्रतापराव गुजरांनी चार-पाच महिने स्वराज्याचा गाडा अतिशय व्यवस्थित चालविला. युवराज शंभूराजांना पंचहजारी मनसबदार म्हणून जेव्हा सहा महिने संभाजीनगरला राहावे लागले तेव्हा सोबत प्रतापराव होतेच. १६७० साली राजांच्या समवेत जाऊन सुरतेची बेसुरत करण्याचे कामही त्यांचेच. कोकणापासून विदर्भातील कारंज्यापर्यंत प्रतापरावांची तलवार चालली. म्हणूनच पुढे राजांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली.

मराठी मुलुखावर आक्रमण करण्याकरिता शहाने आपला कर्नुलचा जहागिरदार बहलोलखानाची नियुक्ती केली. ३० हजारांची फौज घेऊन तो निघाला. खानाचा मुक्काम मिरजेच्या बाजूला कर्नाटक प्रांतातील उमराणी गावात पडला असता ४०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी वेळात पार करत प्रतापरावांनी भल्या पहाटे तळ्याभोनती नाकेबंदी करून खानाची नाकेबंदी केली. कुठलाही प्रतिकार न करता बहलोलखान प्रतापरावाला शरण आला. आपण पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला येणार नाही म्हणत अभयदान मागितले. तेव्हा प्रतापरावाच्या मनातील मराठा जागा झाला आणि त्यांनी मोठ्या मनाने बहलोलला माफ करत सोडून दिले. इकडे महाराज राज्याभिषेकाच्या तयारीत असताना शत्रूपासून साकध होते. मोगलांचा सुभेदार बहादुर खानाला गोडी गुलाबीची पत्रे पाठकून झुलकत ठेकले होते. अशाकेळी हातात आलेला शत्रू परस्पर सोडून दिल्याने राजांची प्रतापराकांकर इतराजी झाली. खरमरितपणे लिहिलेल्या पत्रात राजांनी लिहिले, ‘सला काय म्हणोन केला? बहलोल गर्दिस मिळवोन तोंड दाखविणे.’ पराक्रमी प्रतापरावांच्या मनावर याचा मोठा परिणाम झाला. अनंतराव मवाजीसह त्यांनी आदिलशाहीच्या प्रदेशात धुमाकूळ घालत अथनी, बाळापूर, संपगाक लुटून फस्त केले. महाराजांचा अंदाज खरा ठरला. खानाने आपला शब्द पाळला नाही. सर्जाखानासह तो पुन्हा स्कराज्याच्या दिशेने निघाला. इकडे राज्याभिषेकाचा मुहूर्त जकळ येत होता. राजे स्वतः आदिलशाही प्रांतात आक्रमण करून आदिलशहावर वचक बसवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या तयारीत असताना सोडून दिलेला बहलोलखान पुन्हा आडवा आल्याने राजांची नाराजी आणखी वाढली. त्यामुळे प्रतापरावांची बेचैनी आणखी वाढली. बहलोलखान स्वराज्यावर पुन्हा चालून येत असल्याचे पाहून त्यांना राग येणे स्वाभाविक होते.

बहलोल कोल्हापूरच्या बाजूने पन्हाळ्यावर आक्रमण करत स्कराज्याच्या दिशेने निघाला होता. प्रतापरावांना खानाची खबर लागली. खान या वेळी गडहिंग्लजच्या बाजूला नेसरी ऊर्फ सावंतवाडीच्या परिसरात ताकदेवाडी ते डेनेवाडी भागात सांबऱ्याच्या माळावर मुक्कामाला होता. आज लोक याला लष्करतळ म्हणून ओळखतात. जवळून घटप्रभा नदी वाहते. नेसरीच्या जवळ डोंगराची उंची २६३० फुटांपर्यंत असल्याने दऱ्याखोऱ्यामुळे हा भाग गनिमी वाक्यासाठी योग्य असल्याची भावना प्रतापरावांची झाली असावी. प्रतापराव गुजरांनी बहलोलखानाच्या हालचालीची माहिती घेत गडहिंग्लजपासून जवळ ४ किलोमीटरवर भडगाव, सामानगड व हिरण्यवेशीच्या जवळ आपला मुक्काम हलविला तर खान आता चंदगड, गंधर्वगडापासून पुढे सरकत होता. प्रतापरावांचा राग अनावर झाला. राजांची इतराजी दूर करायची असेल तर खानाचा अफझल करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. प्रतापरावांचा हात समशेरीला गेला आणि ‘हर हर महादेव’ म्हणत त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता घोड्याला टाच मारली. आपल्या सरदाराचा अवतार पाहून त्यांचे सहकारी विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिळदेव, दीपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर त्यांच्यासोबत निघाले. प्रतापराव गुजरांसह हे सात वीर प्राण हातावर घेऊन १५००० फौजेचा मुकाबला करण्यासाठी निघाले. लढाई मोठी विषम होती. संख्येच्या बळावर दोन्ही पक्षांची बरोबरी व्हायचा प्रश्नच उरला नव्हता. नेसरीच्या सांबऱ्याच्या माळावर हर हर महादेवची गर्जना झाली. मराठ्यांचे सात वीर शत्रूवर तुटून पडले. एकच कापाकापी सुरू झाली. परिणाम काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. जेधे शकाकलीनुसार माघ वद्य १४ (शिवरात्र) शके १५९५ म्हणजेच मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी प्रतापरावांसह या सातही वीरांना वीरगती प्राप्त झाली.

या सात साहसी वीरांच्या दुःखाची बातमी शिवरायांच्या कानावर पडली. राजांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. प्रतापरावांनी एका शब्दाखातर एवढा आततायीपणा का केला? सर्वच इतिहासकारांनी एवढ्या कमी संख्याबळावर खानावर चालून जाण्याबाबत प्रतापरावांना जबाबदार धरले आहे. कुसुमाग्रजांनी प्रतापरावासह या वीरांवर कविता करताना म्हटले आहे,

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढय़ात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणीवाऱ्यावर गात…
वेडात मराठे वीर दौडले सात।।

थोर इतिहासकार का. सी. बेंद्रेंनी मात्र याबाबत वेगळे मत मांडताना म्हटले आहे की, आततायीपणा करण्याइतपत सरनोबत प्रतापराव गुजर काही नवखे नव्हते. राजगडाच्या किल्लेदारीपासून आग्राभेट, सूरत स्वारी, साल्हेरची लढाई यामध्ये त्यांनी आपल्या गनिमी काव्याने शत्रूंना सळो की पळो करून सोडलेले होते. त्यामुळे कदाचित नेसरीच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असलेल्या प्रतापरावांची या वेळी काही तरी वेगळी अशी रणनीती असावी. एखाद्या आडवळी बाजूला शत्रूला गाठून त्यांना खिंडीत पकडावे, त्याच वेळी दुसऱ्या तुकडीने इतर बाजूने शत्रूवर हल्ला चढवावा असेही असू शकते. परंतु युद्धात मात्र जर आणि तरला काही किंमत नसते. इथं ‘जो जिता वही सिकंदर’ असतो. अनेकांना हे गाणे माहीत असेल मात्र त्याचा मथितार्थ कळणार नाही. प्रतापरावांशिवाय इतरांची नावेसुद्धा संशोधकांशिवाय सर्वसामान्य वाचकांना माहीत नसतात. सिद्दी हिलालसारख्या एका मुस्लिम सैनिकाने स्वराज्यासाठी आपले प्राण दिलेले आहेत. अशा सर्वसामान्य सैनिकांच्या बलिदानावरच स्वराज्याचा डोलारा उभा राहिला. सात वीरांच्या बलिदानापुढे बहलोलही नमला. त्याने आपला मार्ग बदलला. तो परत फिरल्याने जवळ येऊन ठेपलेला राज्याभिषेक पुढे निर्विघ्नपणे पार पडला. ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे छत्रपती झाले.

प्रतापराव गुजरांच्या बलिदानाने व्यथित झालेल्या शिवाजी महाराजांनी त्यांची बूज राखली. आपले धाकटे चिरंजीव युवराज राजारामाचा विवाह प्रतापरावांची कन्या जानकीबाईशी केला.
आजही सज्जनगडाजवळ कामथी नावाच्या गावात प्रतापराजांचे वंशज राहतात. पैकी भाऊसाहेब हैबतराव गुजर देशमुख हे हिंदू तर मज्जिदसाहेब अमिनसाहेब देशमुख हे मुस्लिम आहेत. भोसरे गावात आता फक्त एक भिंत शिल्लक आहे तर कामथी गाव उरमोडी धरणात गेल्याने वंशज मावेजासाठी हेलपाटे घालताहेत. एक वंशज नागपुरात राहतात. अलीकडे गुजरांची कन्या सातारच्या छत्रपतींना दिली होती. एकंदर प्रतापरावांसह सात वीरांची बूज राखत नेसरीकरांनी आपल्या गावात त्यांचे भव्य स्मारक उभे केले आहे. शेवटी इतिहासाचे वेड लागल्याशिवाय अशा वेडय़ा वीरांची कथा समजत नाही हेच खरे! 

- सुनिल पाटील
 व्हॉट्अप वरून साभार
94221 49668



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com