नालासोपारा येथील ३८ हजार चौरस फुटांवरील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई


वसई विरार शहरातील भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. शहरातील जवळपास १ कोटी चौरस मीटर क्षेत्रफळावर अनिधिकृत बांधकामे झालेली आहेत. करोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणवर ही बांधकामे सुरू होती. याविरोधात पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे.  गुरूवारी पालिकेच्या प्रभाग समिती ‘ई’ ने नालासोपारा पूर्वेच्या सोपारा येथील उमर कंपाऊंड येथे कारवाई करून बेकायदेशीर बांधकामे जमिनदोस्त केली. भूमापन क्रमांक (सर्वे नंबर ९२) येथे सुशील आव्हाड, अर्शद चौधरी, सैजाद खान, आदी भूमाफियांनी केलेले सुमारे ३८ हजार चौरस फुटांचे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वाणिज्य गोदामे, व्यावसायिक गाळे आदींचा समावेश होता.  प्रभाग समिती ‘ई’चे प्रभारी साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रभारी साहाय्यक आयुक्त प्रेमसिंह जाधव, उपायुक्त किशोर गवस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस बंदोबस्तात नालासोपारा पुर्वेच्या सोपारा फाटा, पेल्हार आणि उमर कंपाऊड येथे ही कारवाई केली

या कारवाईत पोकलन मशिन, जेसीबीच्या साहाय्याने मोठ मोठी वाणिज्य गोदामे तोडण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईत मोठी गोदामे, व्यावसायिक गाळे, पत्र्याची शेड तोडण्यात आली. बांधकामासाठी रचलेला पाया तोडण्यात आला. त्यामुळे भूमाफियांची दाणादाण उडाली. वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे ही कारवाई यापुढे देखील सुरूच राहिल, असे अतिक्रमण विरोधी विभागाचे  प्रेमसिंह जाधव  यांनी सांगितेल. तर एका दिवसात झालेली ही मोठी कारवाई आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही ही कारवाई केली, असल्याचे प्रभाग समिती ‘ई’ प्रभारी साहाय्यक मोहन संख्ये यांनी म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या