भविष्यात जीएसटी आणि आयकर भवनाला घेराव घालून सरकारची कोंडी करणार

 देशात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज देशभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले कोल्हापुरात   विविध संघटनांच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू  राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने दाभोळकर कॉर्नरवरील शिग्नलजवळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करीत राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेत असताना जोरदार झटापट झाली. बंदोबस्तात आंदोलकांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तणाव निवळल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे नामदेव गावडे, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, प्रशांत आंबी यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

भविष्यात जीएसटी आणि आयकर भवनाला घेराव घालून सरकारची कोंडी करणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. सरकारला खुश करण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर तुमचे तुणतुणे बंद पाडायला वेळ लागणार नाही, असा सल्ला यावेळी शेट्टींनी सेलिब्रिटींना दिला. सध्या सर्वच सेलिब्रिटी शेतकरी आंदोलनावर मौनव्रत धारण करून आहेत. त्यावर शेट्टी यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. 

राजू शेट्टी म्हणाले, गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, हे अन्यायकारी सरकार अद्याप आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. मात्र, आज चक्का जामच्या माध्यमातून आम्ही सरकारला केवळ इशारा देत आहोत. आम्हाला माहीत आहे, पोपटाचा जीव कशात आहे. सरकारचे महसुलाचे मुख्य माध्यम म्हणजे जीएसटी भवन आणि त्याच जीएसटी भवनाला बेमुदत घेराव घालून सरकारचे उत्पन्नाचे साधनसुद्धा बंद पडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. शेतकरी थंडीची पर्वा न करता अजूनही त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. मात्र, केंद्र सरकारला अद्याप दया आलेली नाही. उलट शेतकऱ्यांनाच दहशतवादी आणि आतंकवादी म्हटले जात आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुले आता या सरकारला आतंकवादी वाटू लागली आहेत. आमची मुले तिकडे सिमेवर देशाचे रक्षण करत आहेत आणि तुम्ही आम्हालाच आतंकवादी म्हणता? असा सवाल करत आम्हाला देशप्रेम शिकवू नका, असेही शेट्टी म्हणाले.

दरम्यान कृषी कायद्यांविरोधात मागील 73 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात चक्काजाम केला. दुपारी 12 ते 3 या वेळेत झालेल्या जामचा सर्वाधिक प्रभाव राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये दिसून आला. आंदोलकांनी या राज्यांमधील राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रोखले होते.काँग्रेसने या चक्काजामचे समर्थन केले, तसेच अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते या चक्काजाममध्ये सामील झाले.

चक्काजाम संपल्यानंतर भारतीय किसान युनियनचे नेता राकेश टिकैत म्हणाले की, 'दबावात सरकारशी चर्चा करणार नाही. हे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही पुढील रणनीती बनवू. जोपर्यंत कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत शेतकरी घरी परतणार नाहीत.' असा इशाराही टिकैत यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या चक्काजाम दरम्यान काँग्रेस शासित छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बघेल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी अनेक बॅरिकेड लावणे आणि खिळे ठोकल्याप्रकरणी सरकारची तुलना दरोडेखोरांसोबत केली. ते म्हणाले की, 'जुन्या काळात दरोडेखोर गावांत दरोडा टाकण्यासाठी खिळे टाकून सर्व मार्ग बंद करत होते, केवळ आपल्या माणसांना पळण्यासाठी जागा सोडत होते. आता सरकार ही पद्धत अवलंबत आहे'

सरकारने स्वतः शेतकऱ्यांचा आंतरराष्ट्रीय मुद्दा केला. कारण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जागतिक सेलिब्रिटींच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देऊन सरकार त्यांना प्रोत्साहन देत आहे असा आरोप बघेल यांनी केला. तसेच लवकरच यावर तोडगा निघाला तर शेतकरी आंदोलन देशभर पसरेल., असेह बघेल म्हणाले.

राजस्थान कोटामध्ये आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली. तर अलवरमध्ये शेतकऱ्यांनी 10-12 ठिकाणांवर दगड आणि काटेरी झाडे टाकून राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जाम केला. काँग्रेसने शेतकऱ्यांच्या चक्काजामचे समर्थन केले. हरियाणा-पंजाब : शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. रोडवेजच्या बसही बंद होत्या. भिवानी आणि जिंदमध्ये 15-15, यमुनानगर मध्ये 12, करनालमध्ये 10 आणि कैथलमध्ये 5 ठिकाणी चक्काजाम करण्यात आले. हिसा आणि पानीपतमध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय आणि राज्य हायवे जाम केले. दुसरीकडे पंजाबमध्ये भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष जामच्या समर्थनात दिसले. यापूर्वी दिल्लीमध्ये खबरदारी म्हणून 10 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. यामध्ये मंडी हाउस, ITO, दिल्ली गेट, विद्यापीठ, खान मार्केट, नेहरु प्लेस, लाल किल्ला, जामा मशीद, जनपथ आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनचा समावेश याहे. येथे एकूण 285 मेट्रो स्टेशन आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA